
>> दिलीप जोशी
‘‘नारळी पूनम आज तुझी पूजा, अरं दर्याराजा’’ असं म्हणतं कोळी बांधव दरवर्षी उत्साहाने नारळी पौर्णिमा साजरी करतात. या पौर्णिमेपासून हळूहळू दर्या शांत होतो, पाऊस ओसरू लागतो आणि काही महिने बंद असलेली मच्छीमारी पुन्हा सुरू होते. त्यामुळे अर्थातच उत्साहाचं वातावरण असतं.
तसा एकूण श्रावण महिनाच ‘हर्ष मानसी’ निर्माण करणारा. ऊन-पावसाचा रम्य खेळ आणि हिरवाईने नटलेला परिसर प्रसन्नता निर्माण करतो. आता गवत फुलांवर चतुर आणि फुलपाखरं दिसू लागतात. तीन दिवसांचा रंग दाखवणाऱया तेरडय़ाच्या फुलांचे ताटवे दिसू लागतात. नागपंचमीपासूनच सणांचा आरंभ होतो. तरारल्या शेतामुळे शेतकामातून थोडासा विसावा लाभलेला शेतकरी आता पीक तयार झाल्यावर येणाऱया नवान्न पौर्णिमेकडे डोळे लावून असतो. निसर्गाने मनाप्रमाणे साथ दिली तर दान भरभरून मिळतं.
आपल्याकडे जशी नारळी पौर्णिमा असते तसा जगात दोन सप्टेंबरला ‘कोकोनट डे’ साजरा होतो. एवढं या फळाचं महत्त्व. कोकणात तर माडाला कल्पवृक्षच म्हणतात. ठाणे जिह्यापासून ते थेट केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर नारळाच्या वाडय़ा मोठय़ा संख्येने दिसतात. तीच गोष्ट तामीळनाडूपासून बंगालपर्यंतच्या पूर्व किनाऱयाची. त्यामुळे हिंदुस्थानी जीवनशैलीत नारळाचं प्रचंड महत्त्व इतकं की, त्याला पावित्र्यच प्राप्त झालंय. कोणत्याही नव्या गोष्टीचा आरंभ नारळ म्हणजे श्रीफळ वाढवूनच होतो हे आपण अनेक समारंभांत पाहत असतो.
नारळ जगात कुठे कुठे होतो? त्यात विषुववृत्तीय प्रदेश आणि दक्षिण आशियातील अनेक देशांत नारळाचं उदंड पीक येतं. खार जमिनीत समुद्राकाठी नारळाच्या बागा असतात. उत्तम माड चांगला तीनशे फुटांपर्यंतही उंच वाढतो. त्याला वीस-पंचवीस वर्षांत शेकडो नारळ लागतात. तीस ते ऐंशी असं हे प्रमाण क्वचित जास्तही असतं. इंग्लिश ‘कोकोनट’ शब्दाची व्युत्पत्ती कोको म्हणजे डोकं अशा अर्थाची आहे. कारण सुकलेल्या नारळाची साल काढून टाकली तर दोन डोळय़ांसारखे गोल काळे ठिपके दिसतात म्हणून कोकोनट असेल कदाचित आणि नट म्हणजे कठीण कवच.
नारळाचं कवच किंवा करवंटी कठीण आणि बराच काळ टिकणारी असते. त्यापासून सुबक वस्तूही बनवल्या जातात. नारळाला कल्पवृक्ष म्हणायचं कारण म्हणजे या झाडाच्या प्रत्येक भागाचा आपल्याला उपयोग होतो. एकही भाग वाया जात नाही. प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग आहेच.
हिरव्या नारळाला शहाळं म्हणतात. त्यातलं गोड पाणी ऊर्जादायी असतं. उन्हात थकल्या भागल्या जीवाला त्वरित तरतरी आणणारं शहाळय़ाचं पाणी अमृतासारखं वाटतं. केरळ मलबारमध्ये हा व्यवसाय जोरात चालतो. तिथली शहाळी आता वेगवान दळणवळणामुळे मुंबईतही येतात.
नारळाचं सुकलेलं फळ म्हणजेच आपण वापरतो तो नारळ. दक्षिण हिंदुस्थानातल्या आणि महाराष्ट्रात कोकणात तरी स्वयंपाकात नारळाच्या खोबऱयाचा मुबलक वापर होतो. पदार्थाची चव वाढवणाऱया खोबऱयाने कालवणाला चव येते. शिवाय खोबऱयाची चटणी, त्यापासून तयार होणारं ‘दूध’ अशाही गोष्टी असतातच. नारळाचा वापर तिखट आणि गोड पदार्थात सारखाच होतो. नारळाच्या वडय़ा, करंज्या किंवा लाडूही केले जातात. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थात नारळाचं महत्त्व सारखंच. शिवाय नारळ उपासालाही चालतो. त्यामुळे नारळाचं खोबरं बारा महिने उपयुक्त असतं. खोबरं देणारा नारळ उपलब्ध नसेल तर नारळाचा आतला गराचा भाग म्हणजे ‘वाटी’ सुकवून तयार केलेलं सुकं खोबरं बरेच दिवस साठवता येतं. पावसाळय़ात त्याचा अपयोग होतो.
माडाच्या चार ते सहा मीटर वाढणाऱया झावळय़ा म्हणजे त्याची विशाल पर्णसृष्टी. एखाद्या झोपडीचं छप्परही त्यातून तयार होतं. वाळलेल्या झावळीच्या मधल्या ‘शिरे’ला तासून खराटा घरच्या घरी बनवता येतो. नारळाची ‘शेंडी’ म्हणजे चिवट तंतुमय पृष्ठभाग. सुकलेल्या नारळाच्या या तंतुमय भागापासून काथ्या बनवता येतो.नारळाच्या माडाचं खोड काहीसं ‘प्रिंग’सारखं असतं. ते चिवट असतं. त्यामुळे वादळी वाऱयाने झुलणारे माड सहसा पडत नाहीत. या वृक्षाला सोटमूळ (टॅपरूट) नसलं, तरी शेकडो छोटय़ा आणि जमिनीत पसरलेल्या तंतुमूळांवर त्याचा भार आणि तोल लीलया सावरलेला असतो.
जगातील नारळ उत्पादनात इंडोनेशिया आघाडीवर असून तिथे सरासरी वार्षिक नारळ उत्पादन 17 कोटी 70 लाख फळांचं होतं. फिलिपिन्समध्ये 1 कोटी 48 लाख, तर हिंदुस्थानात 1 कोटी 30 लाख नारळ पिकतात. नारळात कार्बोहायड्रेट, साखर, प्रोटिन अनेक व्हिटॅमिन्स आणि तेलही असतं. नारळाचं तेल अनेक आजारांवर औषधी मानलं जातं. करवंटीचं तेलही त्वचारोगावर उपचार म्हणून वापरतात.
…विशेष म्हणजे एखाद्याचा सन्मान करताना नारळ देतात आणि निरोप देतानाही ‘नारळ दिला’ असं म्हणतात. असा हा जीवनव्यापी कल्पवृक्ष आणि त्याचं बहुउपयोगी फळ. मग संस्कृतीने त्याला पवित्र मानलं तर नवल ते काय?





























































