प्रेरणा  – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही

 >> निमिष वा. पाटगावकर

कोरोना विषाणूचा आपल्या एकूण जगण्यावर जो परिणाम होत आहे, त्यानुसार सध्या आपण सर्वजण एका स्थित्यंतराच्या टप्प्यात आहोत. या स्थित्यंतरात शिक्षण क्षेत्रातील बदल हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. ‘ऑनलाइन शिक्षण’ हा पर्याय निवडणं आता काही काळ तरी बंधनकारक असणार आहे. मात्र ते सगळय़ांना शक्य आहे का हेही पाहणं गरजेचं आहे.

मला नुकतीच कुणीतरी 1991 साली ‘किशोर’ मासिकात प्रसिद्ध झालेली ‘टीव्हीवरची शाळा’ कविता व्हॉट्सऍपवर पाठवली. कदाचित आपल्यापैकी बऱयाच जणांनाही ती आली असेल. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असे जे म्हणतात ना, ते या कवितेचे कवी राम अहिवळे यांनी खरे करून दाखवले. नव्वदीच्या काळात इंटरनेटचा उदय हिंदुस्थानात झाला नव्हता म्हणून त्यांनी टीव्हीवरच्या शाळेची कल्पना केली असेल, पण या कवितेत दप्तरांचे ओझे नको, सगळे विषय टीव्हीवरच्या मालिकांसारखे वाटतील, अवघड परीक्षांची भानगड असणारच नाही आणि सिनेमासारखी शाळा तीन तासच असेल अशा काही भन्नाट कल्पना होत्या.

जगात 2020 साल उजाडले तेच मुळी कोरोना नावाच्या विषाणूच्या बातमीने. जानेवारीमध्ये फक्त चीनपुरता मर्यादित असलेला हा विषाणू आपले हातपाय पसरत एक-एक देश आपल्या विळख्याखाली घ्यायला लागला. युरोप, अमेरिकेत त्याने थैमान सुरू केल्यावर हिंदुस्थानच्या वाटेला तो मार्चच्या आसपास आला आणि बघता बघता एकेक व्यवहार ठप्प करायला लागला. महाराष्ट्राने लॉक डाऊन जाहीर केल्यापाठोपाठ देशव्यापी लॉक डाऊन जाहीर झाला आणि जणू काही सर्व कालचक्रच थांबले. यात शैक्षणिक क्षेत्राचाही सहभाग आलाच. दहावीच्या बोर्डाचा शेवटचा पेपर होईपर्यंतही या कोरोनाला थांबता आले नाही. मागचे शैक्षणिक वर्ष संपायच्या आतच सर्व शाळा, कॉलेज ओस पडली. कित्येक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाची अंतिम परीक्षा घेण्याबाबत दीर्घकाळ गोंधळ सुरू होता. त्यामुळे अभ्यासक्रमांची पूर्तता होऊ शकली नाही. अजूनही परिस्थिती अधांतरीच आहे.

कोरोनाच्या विळख्यात लॉक डाऊन वाढतच होता आणि अशा परिस्थितीत मे महिना संपत नवीन अभ्यासक्रमाचा जून महिना उजाडायचे वेध लागले. एव्हाना अंदाज आला होता की, जून महिन्यात शाळा, महाविद्यालये चालू व्हायची सुतराम शक्यता नाही. अशा वेळी तंत्रज्ञान मदतीला धावून आले आणि व्हर्च्युअल म्हणजेच आभासी शाळांचा पर्याय तपासला जाऊ लागला. गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी शाळांसाठी आपली सॉफ्टवेअर उपलब्ध केली आणि त्या ‘किशोर’ मासिकातली टीव्हीवरची नाही, तर इंटरनेटवरची शाळा अस्तित्वात आली. जून महिन्यात चालू झालेला या इंटेनरनेटवरच्या शाळा नवीन माध्यमामुळे जरा चाचपडत होत्या, पण आता विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन्ही या माध्यमाला सरावले आहेत. सरकारची या शाळा किती तास असाव्यात याची धोरणेही अस्तित्वात आली. अर्थात हे सर्व जे चालू झाले आहे तो हिंदुस्थानसारख्या देशात सर्वसामान्यांसाठी पर्याय होऊ शकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे यासाठीचा खर्च गोरगरीबांसाठी परवडणारा नाही. शिक्षणासाठी तुमच्याकडे लॅपटॉप, संगणक, टॅब किंवा कमीत कमी स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुमच्याकडे उत्तम स्पीड असलेले इंटरनेट कनेक्शन किंवा डेटा पॅक असणे गरजेचे आहे. आज अगदी साध्यातला साधा स्मार्ट फोन जरी घेतला तरी चार-पाच हजार रुपये कमीत कमी लागतात. इंटरनेट कनेक्शनसाठी चारपाचशे रुपये मोजावे लागतात ते वेगळेच. सरकारी किंवा महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱया किंवा ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱया जनतेला हे परवडणे कठीण आहे. याचे दुसरे कारण म्हणजे जेव्हा लॉक डाऊन जाहीर झाला तेव्हा तुमच्याकडे या सुविधा असणे अपेक्षित होते. कारण दुकाने पुन्हा उघडेपर्यंत या ऑनलाइन शाळा चालू झाल्या होत्या. तसेच ज्या घरी दोन मुले एकाच शालेय सत्रात असतील त्यांना तर दोन उपकरणे लागत असतील.

युनेस्कोच्या अंदाजाने आज जगभरातील एकूण विद्यार्थी संख्येच्या 72 टक्के म्हणजे 126 कोटी मुलांचा शैक्षणिक अभ्यासक्रम कोरोनामुळे विस्कळीत झाला आहे. हिंदुस्थानातील 32 कोटी विद्यार्थी जनतेला या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आज हिंदुस्थानात 68 कोटी लोक इंटरनेट वापरतात आणि त्यातले 62 कोटी ब्रॉडबँड वापरतात. शहरात आज इंटरनेट सेवा ब्रॉडबँड किंवा मोबाईल नेटवर्कमार्फत पोहोचली आहे, पण ग्रामीण भागात इंटरनेट पोहोचण्याचे प्रमाण जेमतेम 27 टक्के आहे. तेव्हा हे ऑनलाइन शिकण्याची मर्यादा ही सध्या तरी शहरापुरती मर्यादित आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
हे काही तोटे असले अथवा हे शिक्षण काही समाजातील काही मर्यादित घटकांनाच परवडणारे असले तरी याघडीला या शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याशिवाय पर्याय नाही हेही तितकेच खरे. उभा ऑनलाइन शिक्षणाने शिक्षणाचा गाडा काही प्रमाणात तरी चालू आहे. मुले अभ्यासात वेळ घालवत आहेत. आता गरज आहे ती हाच शिक्षणाचा पर्याय सर्वांपर्यंत कसा पोहोचवता येईल याविषयी विचार करण्याची. काही ठिकाणी काही शाळांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून हा प्रयत्न केला आहे, तर काही ठिकाणी यूटय़ूबमार्फत प्रयत्न चालू आहेत. यासाठीही स्मार्ट फोन आणि डेटा लागणार आहेच, पण हा संगणकापेक्षा कमी खर्चिक पर्याय असेल. या ऑनलाइन शिक्षणात विज्ञानाची प्रात्यक्षिके करता येणार नाहीत, व्यायामाचा तास नसेल तेव्हा यासाठीही नवनव्या कल्पना राबवायची गरज आहे. शालेय शिक्षणाबरोबरच जे महाविद्यालयीन शिक्षण आहे अथवा पदव्युत्तर शिक्षण आहे, त्यामध्ये अनेकदा संदर्भ ग्रंथांचा वापर करावा लागतो. आज सर्व ग्रंथालये बंद आहेत तेव्हा जे काही संदर्भ मिळवायचे आहेत ते फक्त इंटरनेटच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी जे उच्च शिक्षणासाठी परदेशी जायची स्वप्ने बघत होते, त्यांचे भवितव्यही अंधार आहे.

आजच्या घडीला सर्वात कळीचा मुद्दा आहे, तो विद्यापीठाच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतचा. विद्यापीठ आयोगाने या परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. त्यादृष्टीने सगळ्या पातळीवर तयारी सुरू आहे. कोविडच्या काळात या परीक्षा ऑनलाइन घेणेच अनिर्वाय असले तरी काही परिस्थितीत मात्र त्या ऑफलाइनच घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळेच येत्या काळात परीक्षांचा मुद्दा मार्गी लागणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागतिक पातळीवरच तूर्तास आपण अशा चक्रव्यूहात अडकलो आहोत, जिथे कोरोनावर ठाम उपाय माहीत नाही, आटोक्यात आणणे कठीण जात आहे. जिथे रोज केसेस वाढत आहेत, तिथे शैक्षणिक धोरण ठरवणे महाकठीण होत आहे. सध्या तरी आपल्याकडे कोरोनाच्या प्रसाराबरोबरच ऑनलाइन शिक्षणाचा प्रसार वाढवण्याशिवाय पर्याय नाही.

[email protected]

(लेखक आयटी क्षेत्रातील तज्ञ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या