
>> विकास जोशी
खादीचा शर्ट किंवा झब्बा, वेगवेगळ्या नक्षीचा किंवा पोताचा, गव्हाळ मध्यम उंची आणि बांधा, खांद्यावर शबनम लटकलेली, त्यात एखादे पुस्तक, कात्रण किंवा काहीतरी संदर्भवजा वस्तू, पांढरी होत गेलेली दाढी, केस आणि हसमुख चेहरा, हाताची घडी घालून कायम कुठल्याही घोळक्यात सहज सामावणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे चित्रकार प्रा.दिलीप बडे. न सांगताही ओळखीचं, जवळचं आणि निराळं वाटणारं चालतं बोलतं पोर्ट्रेट…चित्रकाराचं. या पोर्ट्रेटनंच आज धक्का दिला. पोर्ट्रेट पेंटिंग…चित्रकाराने केलेली चित्रचौकटीतल्या व्यक्तीची अंतर्बाह्य ओळख. केवळ ओळखीपेक्षाही व्यक्तिमत्त्वाची सहज ढब, भावस्पर्शी, सौंदर्यात्मक पद्धतीने व्यक्तिमत्त्वाचे ‘पोर्ट्रेट’ करणारे चित्रकार कमीच आहेत. मराठवाडय़ात पोर्ट्रेट विषयात भरीव योगदान देणाऱया चित्रकारांत प्रा.दिलीप बडे यांची ओळख आहे, राहीलही. विशेषतः मराठवाडय़ातील चित्र, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक चळवळीतील प्रत्येक पिढीला मित्र वाटणारे सळसळीत व्यक्तिमत्त्व होते. विद्यार्थी चळवळ, नामांतर चळवळ, विद्यापीठीय अनेक चळवळींशी संबंध ठेवत आणि संभाजीनगरच्या शासकीय कला महाविद्यालयाशी ‘पोर्ट्रेट’ विषयासाठीचे प्रा. म्हणून जोडले गेले, ते थेट निवृत्त अधिष्ठाता पदापर्यंत. या काळात अनेक विद्यार्थ्यांना पोर्ट्रेटमधूनच अर्थार्जनाचे धडे देणारे अध्यापक होते. अशा पोर्ट्रेट पॅलेटवर आज रंग निस्तेज झाले…उदास रंगछटा घेऊन. प्रा.दिलीप बडे यांचा जन्म 1953चा…अंबाजोगाईचा. गाव सुटलं तरीही गावाविषयीची आस्था, मित्रपरिवार, स्नेह जुळवून बडे सर कुठूनही प्रवास करता करता व्हाया अंबाजोगाई दौरा करीत असत. प्रवास करणं अत्यंत आवडीचं. त्याला वेळ, काळ… काहीही नाही. त्यामुळे प्रवास करताना विशिष्ट गाव, त्या ठिकाणच्या विशिष्ट चवीही चविष्ट पद्धतीने आस्वादायच्या हेही आवडीचं. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् इथून कला शिक्षण 1971 साली पूर्ण केलं आणि जवळ जवळ 35 वर्षे मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर इथे अध्यापन केले. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. मुंबईत शिकत असताना पैशांची निकड भागवण्यासाठी पोर्ट्रेटस् केली आणि आवड व निकडीतून पोर्ट्रेट सुरू झाले. तीच दिलीप बडे यांची ओळख झाली. पोर्ट्रेट परंपरेतील दिग्गज अध्यापक चित्रकारांचा सहवास त्यांना मिळाला. त्यांच्या ‘पोर्ट्रेट पॅलेट’ आणि रंगलेपनातून हीच परंपरा दिसते. व्यावसायिक आणि कलात्मक पोर्ट्रेटमध्ये हाच स्कुलिंग पॅटर्न वापरणाऱया चित्रकारांपैकी दिलीप बडे हे एक नाव आहे. व्यावसायिक पोर्ट्रेट करताना विविध चळवळीतील मित्रपरिवारामुळे सतत चित्रनिर्मिती करीत राहिले. स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राजर्षी शाहू महाराज यांशिवाय पुण्यातील टिळक स्मारक मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध पोर्ट्रेटस् प्रा.दिलीप बडे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात फाईन आर्ट विभाग सुरू झाला. फाईन आर्ट बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य, फॅकल्टी डीन, ऍकॅडेमिक कौन्सिलचे सदस्य अशा विविध महत्त्वाच्या पदांवर विविध जबाबदाऱया पार पाडल्या. युवक महोत्सव हा जिव्हाळ्याचा विषय होता. कायम युवकांसोबत जोडून घेणे, समस्या सोडविणे हे प्रेरणादायक होते. म्हणूनच सर्व पिढय़ांशी त्यांचे मैत्रीचे नाते राहिले. यासोबतच संपर्कातील माणसाचे जवळून अवलोकन करणे…पोर्ट्रेट करताना चित्रकाराला त्या गोष्टीचाच अधिक उपयोग होत असतो. तशाच चष्म्यातून दिलीप बडे व्यक्तिमत्त्व पाहत असत, चित्र करीत असत. सहज, सोपं, पारदर्शी, अंतर्बाह्य. प्रथितयथ व्यक्तींची पोर्ट्रेट करताना त्यांचे विचार ऐकणे, पाहणे, वाचणे, प्रसंगी त्या त्या स्थळाची पाहणी करून चित्र संयोजन करणे ही त्यांचीही पद्धत होती. कलात्मक पोर्ट्रेट किंवा वर्गातील डेमोन्स्ट्रेशन्समध्ये त्यांनी केलेली प्रा.सुधाकर लवाटे यांचे, कविता महाजन हिचे केलेले पोर्ट्रेट या पद्धतीचे आहे. अशा दोन्ही पातळ्यांवर चित्रनिर्मिती करणारे प्रा. दिलीप बडे यांना राज्य कला पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, बी.व्ही.ओक पुरस्कार, इंडो-अरब सोसायटी पुरस्कार मिळालेले आहेत. विविध शहरांतील कलादालनांमध्ये चित्र प्रदर्शने झाली आहेत. असं हे व्यक्तिमत्त्व कधी अचानक भेटत असे तसेच धक्कादायक निधनामुळं पॅलेटवरचे रंग उदास झाले आहेत. प्रा.दिलीप बडे आता कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात, चित्रप्रदर्शनात अचानक भेटणार नाहीत ही कल्पनाच असंख्य मित्र व विद्यार्थ्यांना चटका लावून गेली.



























































