दिल्ली डायरी – राजस्थानच्या वाळवंटात काँग्रेसला ‘नवसंजीवनी’

1239
ashok-gehlot

>> नीलेश कुलकर्णी  ([email protected])

ऐतिहासिक राममंदिर निर्माणाचा निकाला लागूनही राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या निर्णयाने भाजपला तारले नाही. वास्तविक, कलम 370 आणि इतर राष्ट्रीय मुद्दे स्थानिक राजकारणात तापवायचे आणि देशभक्तीची हायटाईडनिर्माण करायची, हा भाजपचा आजवरचा प्रचाराचा खाक्या होता. मात्र आता तो उलटा पडताना दिसत आहे. एकीकडे झारखंडमध्ये भाजपला पुरेसे स्थानिक मुद्दे हाताशी नसल्याने सत्तेसाठी झगडावे लागत आहे तर दुसरीकडे ज्या राजस्थानने लोकसभा निवडणुकीत मतांचे भरभरून दान भाजपच्या पारडय़ात टाकले त्याच राजस्थानच्या वाळवंटात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.

राष्ट्रीय मुद्दे स्थानिक राजकारणात आता गैरलागू ठरत आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जनतेच्या जीवन-मरणाचे प्रश्न आ वासून उभे आहेत. मंदीबाईच्या फेऱ्याने अनेक उद्योग बंद पडत आहेत, बेरोजगारीची कुऱहाड अनेकांवर कोसळत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक घरातल्या चुली विझत आहेत. अशा परिस्थितीत राजस्थानातील जनतेला भावले ते काँग्रेसने उपस्थित केलेले स्थानिक मुद्दे. त्यामुळे एका अर्थाने ही निवडणूक ही स्थानिक मुद्दे विरुद्ध राष्ट्रीय मुद्दे अशीच फिरत गेली आणि काँग्रेसने राजस्थानात चमत्कार करून दाखविला. 49 नगरपंचायतीपैकी 20 जागी काँग्रेसने निर्णायक सत्ता मिळवली तर 6 जागी भाजपने सत्ता संपादन केली इतर 23 जागी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना अपक्ष व इतरांना साथीला घेऊन सत्ता हस्तगत करावी लागणार आहे.

अगदी सहाएक महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ करून जनतेने भाजपला राजस्थानातून भरघोस पाठिंबा दर्शविला होता. मात्र सहा महिन्यांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. नॉन इश्यूजचे इश्यू बनवणे आणि इश्यूजला नॉन इश्यू करणे, ही कला सत्ताधाऱ्यांना चांगलीच अवगत झालेली असली तरी ही कलाच ‘बॅकफायर’ होताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि हरयाणासारख्या लष्कर आणि लढायांची मोठी परंपरा असलेल्या राज्यांत देखील कलम 370 चा मुद्दा विधानसभा निवडणुकीत क्लिक झाला नव्हता. मात्र त्यापासून भाजप नेतृत्वाने कोणताही बोध घेतला नाही. झारखंडमध्येही आगामी विधानसभा निवडणुकीत कमळ खुलविताना भाजपची दमछाक होत आहे. राजस्थानच्या जनतेने तर भाजपला नाकारले आहे. भाजपचे नेते प्रचारात राष्ट्रीय मुद्दे मांडत असताना तिथले काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्र्यांवर जबाबदारी सोपवून स्थानिक मुद्दे प्रचारात आणून भाजपचा नियोजनबद्ध पाडाव केला. जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारे मुख्यमंत्री अशीही आपली एक इमेज गेहलोत यांनी बनवली आहे. याउट भाजपच्या पूर्वीच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या कायम राजेशाही थाटात वागायच्या. त्या अहंकाराचा फटकाही भाजपला बसला. काँग्रेससारख्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षात जो काही धोरणात्मक गोंधळ गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या नगरपंचायतीचा निकाल काँग्रेससाठी नक्कीच नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.

ईडीची मिस्टेक…’

the-enforcement-directorate

विरोधकांच्या मागे ‘ईडी’ची पीडा लावून त्याला सळो की पळो करून सोडण्याचे धोरण सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी बेमालूमपणे राबवायला सुरुवात केली असली तरी, या ईडीचे काही ‘साईड इफेक्ट’ही दिसून येत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा सध्या तरी ईडीकृपेने मुक्काम पोस्ट तिहार असतानाच, कर्नाटकातले एक तालेवार नेते डी. के. शिवकुमारही आता चिदंबरम यांना ‘कंपनी’ द्यायला तिकडे पोहचले आहेत. वास्तविक चिदंबरम आणि शिवकुमार यांच्या अटकेनंतर या ईडीचा दरारा सर्वदूर पसरला होता. ईडीसारख्या संस्था या सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचत असतात त्यामुळे यामागे राजकारणाचा एक भाग असतोच. मात्र विरोधकांविरोधात सरकारने केलेल्या अतिरिक्त वापरामुळे ईडी बदनाम होत असतानाच आता एका ‘मिस्टेक’मुळे ईडी चांगलीच गोत्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ईडीने चिदंबरम यांच्यावरील आरोपपत्राचाच मजकूर कॉपी पेस्ट करून शिवकुमार यांच्याबाबत चिकटवल्याने मोठा घोटाळा झाला. ‘शिवकुमार हे देशाचे माजी गृह व अर्थमंत्री असल्याने त्यांनी सरकारी यंत्रणांवर दबाव निर्माण केला’, असे ईडीने शिवकुमारांच्या बाबतीत नमूद केले. सर्वोच्च् न्यायालयानेच खरडपट्टी काढल्यामुळे ही कट, कॉपी पेस्टची मिस्टेक ईडीच्या लक्षात आली. ईडीच्या या मिस्टेकमुळे शिवकुमारांना देशाचे माजी गृहमंत्री बनवले त्यामुळे कोठडीची हवा खाणारे शिवकुमार काहीसे सुखावलेही असतील. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न उराशी बाळगून शिवकुमारांनी कर्नाटकाच्या राजकारणात आजवर नाना प्रकारच्या करामती केल्या. त्यांच्या या करामतीमुळेच त्यांना ईडीच्या बेडीत अडकावे लागले आहे. कोणाचीही मानगूट पकडून त्याला तुरुंगात डांबणे एकवेळ ईडीसाठी सोपे, पण आरोपपत्र तयार करणे कठीण असते. ईडीने जरा दमानं घ्यावे नाहीतर ईडी हा विनोदाचा विषय ठरू शकेल.

गौतम गंभीरची जिलेबीबाई

gambhir3

गौतम गंभीर हे भाजपाचे दिल्लीतले खासदार आहेत, हे सांगण्याचे कारण म्हणजे. हे महाशय खासदार असले तरी संसदेत कमी आणि क्रिकेटच्या मैदानावर किंवा टीव्हीवरच जास्त असतात. गंभीर हे एक अव्वल क्रिकेटपटू होते यात वादच नाही. मात्र आता त्यांनी हातात कमळ घेऊन लोकसभेची पायरी चढली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्याकडून ‘गंभीर’ वर्तनाची अपेक्षा आहे. अर्थात गंभीरपणे वागतील ते गौतम गंभीर कसले? आजवरचा त्यांचा इतिहास असा बिनगंभीर आहे. मध्यंतरी पंजाब आणि हरयाणात पराली जाळल्यामुळे दिल्लीचे ‘गॅस चेंबर’ बनले होते. या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी सरकारने तातडीने एक बैठक बोलावली. खासदार या नात्याने गंभीर यांनाही त्याचे निमंत्रण होते. मात्र त्याऐवजी गंभीर महाशय तिकडे इंदूरमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यासोबत जिलेबीवर ताव मारताना दिसून आले. हे फोटो व्हायरल झाल्यामुळे गंभीर यांच्यावर टीका होऊ लागली. मात्र ट्रोल करणाऱ्यांनाच ते तडकावू लागले. हे जिलेबीबाईचे प्रकरण महागात पडेल, असे लक्षात येताच आणि भाजपच्या वरिष्ठांनी खडसावल्यानंतर इंदूरची मॅच आणि जिलेबीचा तुकडा अर्धवट टाकून गंभीर दिल्लीत परतले. संसदेत प्रदूषणावर झालेल्या चर्चेतही त्यांनी सहभाग घेतला आणि आपली ‘गंभीर’ मते मांडली. मात्र ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती’, हे त्यांना ‘गंभीर’पणे कोण समजावून सांगणार?

आपली प्रतिक्रिया द्या