
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
हिंदुस्थानी संस्कृती ही बहुरंगी आहे. संगीत नाटक अकादमी आपल्या सर्व दृकश्राव्य कलांना एकत्र आणण्याचे काम ‘श्रेष्ठ भारत संस्कृती समागम’ या उपक्रमातून करत आहे.
संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन आणि सचिव रिटा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वर, अहमदाबाद, अमृतसर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये ‘श्रेष्ठ भारत संस्कृती समागम’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, वाद्यवादन, नाटक, लोककला, कठपुतली परंपरेसारख्या अन्य पारंपरिक कलांनी हिंदुस्थानातील विविध राज्ये समृद्ध आहेत, या सर्व कलांना एका छत्राखाली आणून त्यावर विचारमंथन घडविण्याचा प्रयत्न म्हणजे ‘श्रेष्ठ भारत संस्कृती समागम महोत्सव’ असल्याचे शेखर सेन म्हणाले. या महोत्सवात एकूण 300 अभ्यासक सहभागी झाले असून त्यांच्या शोधनिबंधांचा मोठा ग्रंथ संगीत नाटक अकादमी प्रसिद्ध करणार आहे.
श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र गुवाहाटी येथे 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत अनेक कलाप्रकारांचे हृदयगम दर्शन घडले. आसामचे राज्यपाला जगदीश मुखी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. आसामची भूमी ही संत शंकरदेवांनी वैष्णव संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. संतकवी, नाटककार, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सुधारक म्हणून त्यांचे कार्य मोठे होते. संगीतातील बोरगीत प्रकार, नाटकातील अंकिया नाट, नृत्यातील संस्कृती समागममध्ये कलावंत आणि कला क्षेत्रातील अभ्यासकांची मांदियाळी जमली. ‘आगरा बाजार’ या ‘नया थिएटर’ या मध्य प्रदेशमधील संस्थेने सादर केलेले नाटकाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार, दिग्दर्शक हबीब तन्वीर यांनी 1959 मध्ये हे नाटक रंगभूमीवर आणले. अद्याप त्याची मोहिनी कायम आहे. छत्तीसगढच्या ‘नाच्या’ परंपरेचा विशेष अभ्यास करून या नाच्या लोकनाट्य शैलीला पैलू पाडण्याचे ऐतिहासिक कार्य हबीब तन्वीर यांनी केले.
आयुष्याच्या बाजारात कोणी ग्राहक तर कोणी विक्रेता असतो. हा बाजार सुखदुःखांचा, वंचना-उपेक्षांचा, सर्वसामान्यांच्या संघर्षांचा, स्वप्न विकण्याचा, स्वप्न खरेदी करण्याचा. या बाजारात पोटाची खळगी भरण्याची विवंचना एका बाजूला तर भरल्यापोटी ग्रंथांवर चर्चा, गझलवर चर्चा करणारे दुसऱ्या बाजूला. या बाजारात काकडीवाले, कलिंगडवाले, लाडूवाले, कुल्फीवाले, पतंगवाले विक्रेते. एकमेकांशी भांडणारे, पण पुन्हा होळीला एक होऊन वेगवेगळ्या रंगातून जणू ‘अवघा रंग एकचि झाला’ म्हणणारे… हबीब तन्वीर यांच्या ‘आगरा बाजार’ नाटकाने सर्व रसिकांची मने जिंकली. ‘श्रेष्ठ भारत संस्कृती समागम’ ही देशातील ज्येष्ठ, श्रेष्ठ कलावंतांना एका सूत्रात गुंफणारी चळवळ आहे. हा संस्कृतीच्या विविधतेचा एकात्म रंगतदार गोफ आहे हे निश्चित!
बहुरंगी कार्यक्रम
या महोत्सवात जयंती कुमारेश यांनी कर्नाटकी वीणा वादन सादर केले. अजय चक्रवर्ती यांनी जोग राग सादर केला. तर तेलंगणातील येल्ला व्यंकटेश्वर राव यांनी तालवाद्य कचेरी सादर केली. गुजरातच्या योगेश गढवी यांनी गुजरातचे लोकसंगीत सादर केले. गरब्याच्या संगीतावर रसिकांनी ठेका धरला. उमाकांत बैरागी यांनी आसामचे लोकसंगीत सादर केले. ध्यानानंद पांडा यांनी ओरिसाचे लोकनृत्य सादर केले ते अतिशय आवेशपूर्ण होते. ‘थांग-ता’ या मणिपूरमधील युद्धनृत्य प्रकार, ढाल-तलवारीचे श्वास रोखून धरणारे खेळ विश्वेश्वर शर्मा यांच्या पथकाने सादर केले. भारती शिवाजी यांचे मोहिनीअट्टम, रामकृष्ण तालुकदार, अनिता शर्मा या आसामच्या कलावंतांचे सत्रिया नृत्य नेत्रसुखद होते. चित्रा विश्वेश्वरन यांनी भरतनाट्यम् तर प्रभितान्सू दास यांचे कठपुतली नाटक, धर्मेश्वरनाथ ओझा यांचे ओजापली, पंडित चंगमई यांचे बिहूनृत्य, अहमद हुसेन, महम्मद हुसेन यांचे गझल गायन असे बहुरंगी कार्यक्रम या समागममध्ये आयोजित करण्यात आले होते.




























































