आभाळमाया – बुध-शुक्राची खबरबात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> [email protected]

सूर्य आणि पृथ्वीमधल्या दोन ‘अंतरग्रहां’पैकी पृथ्वीजवळचा शुक्र, तर सूर्यापासून पहिल्या कक्षेतला ग्रह बुध. सूर्यापासून तो सुमारे सात कोटी किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे सूर्य पृथ्वीपेक्षा निम्म्या अंतरावर आहे. तो 88 दिवसांत सूर्याभोवती परिक्रमा करतो म्हणजे तेवढय़ाच दिवसांचं त्याचं वर्ष. त्याला स्वतःभोवती फिरायला मात्र 58 दिवस (पृथ्वीचे) लागतात. बुधाचा व्यास आहे 4880 किलोमीटर. दिवसा त्याचं तापमान 350 अंश तर रात्री उणे 170 अंश इतकं विषम असतं. अशा या बुध ग्रहाकडे दुर्बिणीतून बघण्याचा पहिला मान अर्थातच गॅलिलीओचा. सतराव्या शतकात त्यांनी आणि थॉमस हॅरिष्ट यांनी सूर्यसान्निध्यात असलेल्या बुध ग्रहाचं स्पष्ट दर्शन घेतलं. अर्थात त्या काळात माणूस कधीकाळी अंतराळात जाईल, चंद्र पादाक्रांत करील किंवा मंगळ मोहिमेची स्वप्नं बघेल असं कुणाच्या कल्पनेतही आलं नसेल. परंतु वैज्ञानिक संशोधनाला एकदा का गती मिळाली आणि काही कारणांनी ती मध्येच थबकली नाही तर एकामागून एक विस्मयकारी शोध लागतच राहतात. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच माणसाला परग्रहावर जाण्याची स्वप्नं पडू लागली. 1957 मध्ये गगारीन आणि 1969 मध्ये आर्मस्ट्राँग यांनी इतिहास घडवल्यानंतर एकूणच सूर्यमालेचा वेध घेण्याचे वेध लागले. मरीनर-2 तर 1962 मध्येच शुक्राजवळून फिरलं होतं. अमेरिकेच्या मरीनर रॉकेट मालिकेतलं मरीनर-10 हे शेवटचं. त्याने शुक्र आणि बुध या ग्रहांना फेरी मारून त्याचं खूप जवळून निरीक्षण केलं. तोपर्यंत माणूस अंतराळात आणि चंद्रावरही जाऊन आल्याने 3 नोव्हेंबर 1973 रोजी शुक्र-बुधाकडे झेपावलेल्या मरीनर-10 ने बुधाचे पहिल्यांदा दर्शन घेतले. शुक्र सूर्यापासून सुमारे 11 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला सूर्यमालेतील दुसरा ग्रह आणि आपला एक शेजारी. याची वैशिष्टय़े अनेक. कार्बन – सल्फरच्या ढगांनी वेढलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाचं दर्शन दुरून अशक्यच. शिवाय त्याचा अक्ष 178 अंशात कललेला. म्हणजे सूर्योदय पश्चिमेला तर सूर्यास्त पूर्वेला. शुक्राच्या एका वर्षापेक्षा त्याच्यावरचा दिवस मोठा. शुक्राच्या भूमीवर उभं राहिलं तर केवळ घुसमट होईल. रात्रीचं आकाश दिसण्याची शक्यताच नाही. शुक्र आणि बुध या दोन्ही ग्रहांच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी मरीनर-10 वर अनेक उपकरणं होती. रोबोटिक अवकाश अभियानाचा तो आरंभ होता. मरीनर शुक्र-बुधजवळून जाताना यानाची कक्षा सांभाळणं फार महत्त्वाचं होतं. मुख्य म्हणजे यान बुध ग्रहाजवळ गेल्यावर सूर्याचं गुरुत्वाकर्षण प्रचंड प्रमाणात वाढणार होतं. तसेच सूर्याच्या उष्णतेचा तीक्र, दाहक मारा होणार होता. त्यासाठी तेवढंच उष्णतारोधक कवच असणे गरजेचं होतं. त्याची सर्व चाचणी करूनच यान उडालं. आधी हे उड्डाण 6 ऑक्टोबर 73 रोजी ठरलं होतं, परंतु पुन्हा कडक तपासणी करून 3 नोव्हेंबरला ते अवकाशात गेलं. 5 फेब्रुवारी 1974 रोजी मरीनर-10 शुक्राजवळ पोहोचलं असताना त्याला कोहाडतेक धूमकेतू जवळून दिसला. शुक्रापासून मरीनर तेव्हा 5768 कि.मी. अंतरावर होते. 29 मार्च 1974 रोजी मरीनर-10 सूर्यमालेतल्या पहिल्या ग्रहापासून केवळ 703 किलोमीटर अंतरावर पोचणारं पहिलं मानवनिर्मित यान ठरलं. तेव्हा ते बुधाच्या सावलीच्या बाजूला होतं. 21 सप्टेंबर 74 रोजी ते पुन्हा बुधाला पाहून पसार झालं. 4 मार्च 1975 रोजी त्याने अखेरचा संदेश पाठवला. त्याचं ईप्सित कार्य संपून अनेक वर्षे लोटली तरी त्याला सोलार – पॅनलद्वारा ऊर्जा मिळेपर्यंत ते सूर्याभोवती गरगरत राहणार. सूर्याभोवती सेकंदाला 48 किलोमीटर वेगाने फिरणाऱया छोटय़ा बुधाचं आणि तेजस्वी शुक्राचं ते साथीदार ठरलंय. सध्या शुक्र नुसत्या डोळय़ांनी पहाटे सूर्योदयापूर्वी दीड तास दिसतो, तर बुधही दुर्बिणीद्वारे पहाटेच पाहता येईल.