
>>द्वारकानाथ संझगिरी
हिंदुस्थानी संघाला न्यूझीलंड संघानेही पाटावर चटणी वाटावं तसं वाटलं. हिंदुस्थानी संघाची देहबोली पहिल्यापासूनच मूक चित्रपटाची आठवण करून देणारी होती. मनात कुठेतरी पराभूत झाल्याची भावना त्यांच्या शरीरावर आणि त्यांच्या मनात जाणवत होती.
आपण सुरुवातीलाच फलंदाजांचा क्रम बदलला. रोहित शर्माच्या जागी किशनला रोहितची कवच कुंडलं म्हणून पाठवलं. काय गरज होती असं करायची?
रोहित शर्माला खरोखरच कवच कुंडलांची गरज आहे का?
ठीक आहे की, पहिल्या सामन्यात तो शाहीन आफ्रिदीच्या इन स्विंगवर बाद झाला होता. पण म्हणून त्याला बोल्टची भीती वाटली का? त्याला वाटली की ही भीती टीम मॅनेजमेंटला वाटली?
हे टाकलेलं एक बचावात्मक पाऊल होतं. तुम्ही ते पाऊल टाकलंत ना की प्रतिस्पर्ध्याला तुम्ही आतून हलला आहात, हे कळतं. खरं म्हटलं तर या सामान्याआधी दोन्ही संघांची स्थिती सारखी होती. हिंदुस्थान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पाकिस्तान विरुद्ध हरले होते. दोघांसाठी हा सामना जिंकणं आणि हरणं हा प्रकाश आणि अंधाराचा प्रसंग होता. पण न्यूझीलंड अशा तऱहेने खेळलं की, प्रकाश हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपण मात्र अंधारात चाचपडत बसलो. त्यांचं आक्रमण अतिशय समतोल होतं. तीन वेगवान गोलंदाज, त्यात एक डावखुरा आणि दोन फिरकी गोलंदाज. त्यांनी अत्यंत अचूक मारा केला. पण अचूक मारा करणं हे गोलंदाजांचं कर्तव्यच आहे. फलंदाजाला त्यातून धावांचा मार्ग शोधायचा असतो. तो आपल्याला सापडलाच नाही. आपण धुक्यात हरवलेली वाट शोधत होतो, असं वाटत होतं.
आपल्या फलंदाजीची आकडेवारी किती बोलकी आहे ते पहा, पावरप्लेमध्ये आपली परिस्थिती होती 2 बाद 35 अशी. म्हणजे खरं तर त्याला अवस्था हाच शब्द योग्य आहे. पुढच्या म्हणजे मधल्या 9 षटकांमध्ये हिंदुस्थानी संघाने आणखीन 3 बळी दिले आणि फक्त 38 धावा काढल्या. 6 व्या षटकापासून ते 17 व्या षटकापर्यंत 71 चेंडूत हिंदुस्थानी फलंदाज एकही चौकार मारू शकला नाही. शतकी धावसंख्या आपल्याला ओलांडता आली, कारण खाली जाडेजाने आक्रमक फलंदाजी केली.
हिंदुस्थानी फलंदाजांचे मोठे फटके हे न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांसाठी बाऊंड्री लाइनवरच्या कॅच प्रॅक्टिस सारखे होते. त्याचं कारण असं होतं की, एकेरी, दुहेरी धावा हिंदुस्थानी संघ आक्रमकपणे धावलाच नाही. हिंदुस्थानच्या खेळीत चक्क 54 डॉट बॉल्स होते. म्हणजे 20 पैकी 9 षटकात धावा या काढल्याच गेल्या नाहीत असा अर्थ होतो. खेळपट्टीत कुठलाही राक्षस लपलेला नव्हता. राक्षस हिंदुस्थानी फलंदाजांच्या मनात होता.
फिरकी गोलंदाजी हे आपल्या फलंदाजांचं बाळकडू असतं. पण सॅन्टनर आणि सोधीने 8 षटकांत फक्त 32 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली आपले भीम अर्जुन. रोहित पहिल्याच चेंडूवर खरं तर धारातीर्थी पडणार होता. त्याचा पूल शॉट थेट क्षेत्ररक्षकाच्या घशात गेला होता. पण घशातून आत नाही सरकला. तो बाहेर आला. त्याला पूल टाळता येत नाही, याचा फायदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आल्याआल्या उठवण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील जीवदान मिळूनसुद्धा पुढे त्याला काही फायदा झाला का? तर नाही किंवा त्याने फायदा उठवला का? नाही.
कोहलीच्या खेळीत तर स्पृहणीय असं काहीच नव्हतं. सोधीने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर एक लेग ब्रेक टाकला आणि त्याने तो पूल केला तो थेट लॉंग ऑनला बोल्टकडे. पंत गेल्यावर तर सावरण्याची सगळीच आशा मिटली.
111 धावांचा पाठलाग टी-ट्वेन्टीमध्ये अशा खेळपट्टीवर हे आव्हान नसतं. बरं ते आव्हान व्हावं म्हणून त्या प्रकारे काही कोहलीने डावपेच रचले का? तर नाही. पण शेवटी तुम्ही 111 धावांमध्ये रोखू शकत नाही. तुम्हाला समोरच्या संघाला बाद करावं लागतं. त्यांच्यावर दबाव टाकावा लागतो. पण तसं काही घडल्याचं दिसत नाही. किंबहुना न्यूझीलंडच्या लक्षात असं आलं की रनरेट वाढवण्याची ही अतिशय चांगली संधी आहे. आणि त्यांनी ती साधली. मिचेलने अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. याबाबतीत गोलंदाजांना खरोखरच दोष घ्यायचा का? मला असं वाटतं की किती आणि का दोष द्यावा? एक गोष्ट खरी आहे की, दवामुळे किंचित चेंडू वेगात बॅटवर येत होता. थोडासा फायदा त्याचा न्यूझीलंडच्या फलंदाजांना झाला. पण ज्या पद्धतीने हिंदुस्थानी फलंदाज त्यांच्या डावात पेपर टाकून उठले ना, त्याचं समर्थन यात करता येत नाही. गोलंदाजांना मी फारसा दोष देणार नाही एवढय़ाचसाठी की, 111 ही धावसंख्या ही रोखण्याची धावसंख्या नसतेच. आपल्याला असं वाटत होतं की शार्दूल ठाकूर आल्यानंतर सगळं काही बदलेल तसं काही घडलं नाही. किंबहुना शार्दूल ठाकूरलासुद्धा मार खावा लागला.
एकच गोष्ट याच्यातून दिसते की, पहिल्या मॅचमध्ये अमुक होता, तमुक नव्हता त्यामुळे आपण हरलो, असं काहीही नाहीये. कुणीही असलं आणि नसलं तरी फरक पडत नाही. सगळे उडदा माजी काळे गोरे आहेत. याला घेतला आणि त्याला घेतला नाही, म्हणून पराभव टाळला गेला नाही.
या दोन्ही सामन्यांमध्ये हिंदुस्थानी संघाची फलंदाजी आणि हिंदुस्थानी संघाची गोलंदाजी ही दुय्यम दर्जाची झाली. त्यांच्या देहबोलीमध्ये कुठेही जिंकण्याची ताकद आहे, असं जाणवत नव्हतं. पराभूत मनाने खेळताहेत असं वाटत होतं. आणि हिंदुस्थानी संघ हा प्रचंड दमलेला आहे, हेसुद्धा जाणवलं. कारण जवळपास तेच 14, 15 खेळाडू गेले 2, 3 वर्षे सातत्याने क्रिकेट खेळताहेत. मग ते कसोटी क्रिकेट असो, वनडे क्रिकेट असो किंवा आयपीएल असो. हा हिंदुस्थानी संघ थकलेला, दमलेला आणि हरलेला वाटतो आणि गंमत पहा की, पुन्हा एकदा न्यूझीलंडने आपल्या महत्त्वाकांक्षेला कुठेतरी आग लावली असं वाटायला लागलंय. टी-ट्वेन्टीच्या मागच्या एका वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने तेच केलं होतं. 2019 मध्ये 50 षटकांच्या वर्ल्डकपमध्ये सुद्धा न्यूझीलंडने आपल्याला हरवलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या वेळी सुद्धा न्यूझीलंडच आपल्या वाटेत आली. आणि इथेसुद्धा अतिशय महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवला. टेक्निकली अजूनही हिंदुस्थानी संघ इथून उपांत्य फेरीत जाऊ शकतो. पण खूप प्रचंड असा अवघड डोंगर समोर आहे. आणि तो ओलांडण्याची ताकद याक्षणी तरी हिंदुस्थानी संघांमध्ये दिसत नाही.



























































