
>> अभिराम भडकमकर
नट आणि पात्र या दोघांमध्ये एक रेषा आहे. नट भूमिकेमध्ये कितीही समरस झाला तरी वाक्यं नाटककाराचीच बोलतो. प्रकाश योजना, संगीत या सर्वांचे भान बाळगूनच काम करतो. या सर्व बाबींमधून नट हा पात्राशी समरस होताना एक तटस्थताही त्याच्यामध्ये असते, असावी लागते. ती त्या नटाची असते. म्हणूनच कलेमध्ये, रंगकर्मीमध्ये अंतर असलं तरी काही मूळ तत्त्वं ही चिरंतन असतात. नव्याने त्यांचा वापर किंवा उपयोग कसा करायचा, हे आपण ठरवायचं असतं. अशा पद्धतीने रंगभूमी पुढे जात असते.
आपल्याकडे ब्रेख्त आला आणि गाजला. त्यामागचं एक मूळ कारण त्यांनी आणलेली एलिनिएशनची थिअरी किंवा तत्त्व हे होतं. नाटकामध्ये रसिक भावविभोर झाल्याने मूळ मुद्दा, विषय किंवा प्रचाराचा भाग दुर्लक्षित राहू नये हे यामागचे खरे तत्त्व होते. नाटक हे आपल्या चळवळीचा विचार मांडण्याचे साधन आहे, असे मानणाऱयांसाठी ब्रेख्त नक्कीच महत्त्वाचा होता. वैचारिक अंगाने पाहता ब्रेख्तची ही एलिनिएशन थिअरी महत्त्वाची होती.
आम्हीही त्या काळात यामुळे भारावून गेलो होतो. आधुनिक रंगभूमीवर ब्रेख्त आणि त्याची शैली क्लृप्ती म्हणून डिवाईस म्हणून वापरले जाऊ लागले. ब्रेख्तने आधुनिक रंगभूमीवर एक नवी रंगपरिभाषा शोधण्यास उद्युक्त केले. साचलेपणातून बाहेर काढले.
पु. ल. देशपांडेंनी यावर ‘तीन पैशांचा तमाशा’ यानिमित्ताने छान मुद्दे मांडले आहेत. आपल्या लोकधर्मी नाट्य परंपरेत ही सारी तत्त्वं, ही शैली आढळते. ती नाटकाला अर्थपूर्णही करते आणि कलात्मक उंचीही वाढवते.
तमाशात एक फेरी मारली की, माणूस मुंबईहून स्वर्गाला जातो. एक फेरी मारली की, एक वर्षाचा काळ उलटला असे ध्वनित होते वगैरे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे ही शैली अस्तित्वात होतीच, पण त्यामागे भावनेने वैचारिकतेवर मात करावी असा विचार नव्हता. वास्तविक शैलीपेक्षा वेगळी ही शैली एका क्लृप्तीचा भाग होता.
नट आणि पात्र या दोघांमध्ये एक रेषा आहे. नट भूमिकेमध्ये कितीही समरस झाला तरी वाक्यं नाटककाराचीच बोलतो. प्रकाश योजना, संगीत या सर्वांचे भान बाळगूनच काम करतो. या सर्व बाबींमधून नट हा पात्राशी समरस होताना एक तटस्थताही त्याच्यामध्ये असते, असावी लागते. ती त्या नटाची असते.
यासंदर्भामध्ये मला ‘तेरेकुतू’ शैलीतील ‘द्रौपदी चीरहरण’ नाटकाची आठवण येते. हे नाटक अर्थातच लोकधर्मी परंपरेतलं. त्यामुळे संगीतनृत्यासारखे हावभाव, मुखवटे, विविध प्रकारची वेशभूषा, रंगसंगती इत्यादी होतेच, पण नाटक सुरू असताना द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाच्या आधी काही क्षण नाटक थांबलं. एक चौरंग पुढे आला. त्याच्यावर काही मुखवटे, फुलं वगैरे ठेवली होती. दु:शासनाचे काम करणाऱया पात्रांनी येऊन त्याची पूजा केली. सर्व नट मंडळी एका रेषेत उभी राहिली आणि त्यांनी काहीतरी म्हटलं…मंत्रांसारखं. पूजा केली आणि नाटक सुरू झालं.
आम्हाला नाटकातला हा भाग कळेच ना! तो झाल्यानंतर आम्ही रंगपटामध्ये जाऊन कलावंतांचे अभिनंदन केल्यानंतर चर्चेच्या वेळी त्यांना विचारलं, “हे काय होतं?” त्यावर ते जे म्हणाले ते फार गमतीदार होतं. ते म्हणाले की, आता द्रौपदीची वस्त्रहरणाचा प्रसंग आहे. या प्रसंगांमध्ये दुःशासन द्रौपदीला अपशब्द वापरणार आहे. दुर्योधन द्रौपदीवर अत्यंत हिणकस अशी शेरेबाजी करणार आहे. त्यामुळे आधी नटसंचाने पूजा करून माता द्रौपदीची क्षमा मागितली आणि तिला म्हटलं, “माते, हे अपशब्द नट म्हणून आम्ही उच्चारत नसून आमचे पात्र उच्चारत आहे. म्हणजे नट म्हणून मी अमुकतमुक हे उच्चारत असून माझ्या शरीरातील दु:शासन आणि दुर्योधन ही पात्रे हे उच्चारणार आहेत आणि आम्ही क्षमा मागितली.”
मला गंमत वाटली. नट आणि पात्र यांच्यातील सीमारेषा ही आपल्या मनामध्ये असते. विंगेमध्ये उभा राहिलेला नट जेव्हा विंगेतला अदृश्य उंबरठा ओलांडून आत प्रवेश करतो तेव्हा तो ते पात्र झालेला असतो. बरं, ते पात्र करत असताना मघाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामधला नटही त्याला दिशा देत असतो, पण या ठिकाणी या लोकांनी नाटक थांबवलं आणि अशी पूजा केली. द्रौपदीची क्षमा मागितली. मला हे सारं फार गमतीदार वाटलं. कारण त्यामागचा विचार बघा ना! समोर असलेला प्रेक्षक आणि त्या नटाची मानसिकताही एका श्रद्धेच्या अंगानं जाणारी आहे आणि म्हणून त्यांनी त्या श्रद्धेने नाटक थांबवून क्षमा मागितली. प्रेक्षकांनासुद्धा हे एलिनिएशन काही वेगळं वाटलं नाही, ते डाचलं नाही. प्रेक्षक आणि रंगकर्मी दोघांनीही एलिनिएशन पचवलं होतं, मुरवलं होतं (‘एलिनिएशन’ हा शब्दही माहीत नसताना). कारण तो आपल्या परंपरेचाच एक भाग होता. ब्रेख्तचे मोठेपण हे की, त्याने हे एलिनिएशन आधुनिक रंगभूमीवरती रूढ केलं. म्हणून कलेमध्ये, रंगकर्मीमध्ये अंतर असलं तरी काही मूळ तत्त्वं ही चिरंतन असतात. नव्याने त्यांचा वापर किंवा उपयोग कसा करायचा, हे आपण ठरवायचं असतं. अशा पद्धतीने रंगभूमी पुढे जात असते.
हा प्रसंग जेव्हा जेव्हा मला आठवतो तेव्हा तेव्हा मला एलिनिएशनचं सूत्र आणखीनच आकळत जातं।



























































