‘नारीगृहा’च्या वैजयंतीताई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>भगवान परळीकर

आजही पीडित किंवा परिस्थितीने पिचलेल्या महिलांची अवस्था आपल्या देशात फार बदललेली नाही. अशाच महिलांसाठी मूळच्या महाराष्ट्राच्या परंतु गुजरातमधील गांधीनगर येथे स्थायिक झालेल्या वैजयंती गुप्ते गेली अनेक वर्षे ‘नारीगृहा’च्या माध्यमातून कार्य करीत आहेत.

महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण याविषयी सरकारी पातळीवर बऱयाच घोषणा केल्या जातात. योजना जाहीर केल्या जातात. त्याचे नेमके किती फलीत महिलांना मिळते याविषयी मतभिन्नता आहे. शिवाय आपल्याकडील सरकारी योजनेच्या अंमलबजावणीबाबत जे ढोबळ चित्र दिसते ते महिलांच्या योजनेंबाबतही आढळते. त्यामुळे आजही पीडित किंवा परिस्थितीने पिचलेल्या महिलांची अवस्था आपल्या देशात फार बदललेली नाही. अशाच महिलांसाठी मूळच्या महाराष्ट्राच्या परंतु गुजरातमधील गांधीनगर येथे स्थायिक झालेल्या वैजयंती गुप्ते गेली अनेक वर्षे ‘नारीगृहा’च्या माध्यमातून कार्य करीत आहेत. वैजयंती यांचे माहेर पुण्याचे. वडील चंद्रकांत देशपांडे तुरुंग अधीक्षक होते. त्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी बदलीच्या गावी जावे लागे. मात्र त्यामुळे सतत बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याचे आणि संघर्ष करीत आनंदाने जीवन जगण्याचे शिक्षण वैजूताईंना मिळाले. त्यात घरचे चांगले संस्कार. त्यामुळे लहानपणापासूनच वैजूताईंनी समाजाभिमुख कार्याचा वसा घेतला. पुढे बिल्डिंग कॉन्ट्रक्टर असलेल्या गिरीश गुप्ते यांच्याशी विवाह झाल्यानंतर आणि गुजरातमध्ये स्थायिक झाल्यानंतरही हे कार्य सुरूच राहिले. विशेषतः घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या स्त्रिया आणि मुली यांची अवस्था आपल्या समाजात फार बिकट असते. सासरी होणारा छळ आणि माहेरच्या आधाराचा अभाव या कोंडीत पिचलेले आयुष्य जगणे हेच त्यांच्या हातात असते. तीच अवस्था पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सापडलेल्या महिला आणि मुलींची असते. त्यांनाही ना घरी जाता येत ना समाजाकडून मान्यता मिळते. अशा स्त्र्ायांना आणि मुलींना सरकारी व सामाजिक संस्थांच्या सहाय्याने स्वावलंबी करण्याचे कार्य नारीगृह या संस्थेमार्फत वैजयंती गुप्ते करतात. एवढय़ावरच त्यांचे काम थांबलेले नाही. झोपडपट्टीत राहणाऱया आणि सरकारी शाळेत शिकणाऱया मुलींचे आरोग्यविषयक प्रबोधन करणे, एचआयव्ही आणि तत्सम रोगांबद्दल जागरूक करणे, त्यांच्या मनावर ज्या भलत्यासलत्या अंधश्रद्धांचा पगडा आहे तो उतरवून त्यांच्यात स्वच्छता आणि आरोग्याची आवड निर्माण करणे अशी कामेही वैजयंती गुप्ते करीत आहेत. हा उपक्रम त्यांनी नुकताच सुरू केला असून वर्षअखेरपर्यंत शहरातील बहुतेक सर्व सरकारी शाळांतील मुलींपर्यंत आपण पोहोचू असा विश्वास त्यांना आहे. नारीगृहातील दोन परप्रांतीय मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची नोंद घेत पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना वैजयंती गुप्ते यांना रक्षाबंधनासाठी आमंत्रित केले होते. ही आपल्या कामाची पोचपावतीच असल्याचे त्या सांगतात. समाजकार्याशिवाय त्या वर्किंग वुमेन्स हॉस्टेलदेखील चालवतात. त्याशिवाय मूकबधिर मुलांसाठी पाळणाघर चालवणाऱया सरस्वती चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या विश्वस्त असून इतरही अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या सक्रिय सदस्या आहेत. ‘स्पर्श’ आणि ‘सितारा’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली असून ‘श्रेया’ आणि ‘शापित’ ही दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अहमदाबाद येथे प्रसिद्ध होणाऱया ‘मराठी माणसं’ या मासिकात नियमित लेखन करतात. त्यांच्या ‘ओढ’ या कथेला बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. अलीकडेच त्यांचा ‘उद्गम’ या पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला आहे. पुण्यातही 26 जानेवारी रोजी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ‘नारीगृहा’च्या वैजयंतीताई म्हणून. आपले हे कार्य पुढेही असेच सुरू ठेवू असा विश्वास त्या व्यक्त करतात.

– [email protected]