लेख – निसर्गाचा वसंतोत्सव

>> दिलीप जोशी 

आज गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा. मराठी पंचांगानुसार (कॅलेंडर) शके 1943 चा आरंभ झाला. यामध्ये 78 वर्षे मिळवली की इसवी सन येतो. आपल्याकडे बारा महिन्यांच्या ऋतुचक्रात प्रत्येक ऋतूला दोन-दोन महिन्यांचा काळ दिला आहे. त्यापैकी पहिले दोन चैत्र-वैशाख हा वसंत ऋतू. गेल्या वर्षीही सारे उत्सव उंबरठय़ाआडच साजरे झाले. यंदा जरा फरक पडेल असं वाटत असतानाच पुन्हा कोविडने डोकं वर काढलं. त्यामुळे माणसांच्या जगातील जल्लोषाला अजून तरी वाव नाही. लसीकरणानंतर पुढचं वर्ष निरोगी होऊन यावं आणि जगाचा घुसमटलेला सांस्कृतिक, व्यावहारिक श्वास मोकळा व्हावा, अशी सदिच्छा आपण आपल्या नववर्षाच्या आरंभी व्यक्त करू शकतो.

माणसांच्या जगाला भयंकर साथीने ग्रासलं असलं तरी निसर्गाच्या राज्यातले इतर प्राणी आणि वनस्पती यांचा जीवनक्रम सुरूच आहे. त्यांच्या जीवनक्रमाला निसर्गाची साथ आणि शिस्तही आहेच. त्यामुळे चैत्र-वैशाखात येणाऱया वसंत ऋतू सृष्टीचा उल्हास निर्माण करणाराच असणार. अनेक पारंपरिक गाण्यांमधून, नाटय़-चित्रगीतांमधून, कवितांमधून या ऋतूचं अनेक भाषांमध्ये प्रसन्न वर्णन आलेलं आहे. फळांचा राजा आंबा याच काळात येणार. मोहरलेल्या आम्रवृक्षावरून कोकिळकूजन कानी पडणार. अगदी मुंबईतसुद्धा कोकिळेचा स्वर कानी पडू लागला आहे.

हा ऋतू पाना-फुलांचा आणि फळांचा. आपल्या भौगोलिक समशितोष्ण कटिबंधातील देशात सर्वत्र वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत होतं. उन्हाळय़ाची चाहूल लागली की, कैरीचं पन्हं तयार होतं आणि रानावनातली अनेक झाडं आपलं वैभव प्रकट करू लागतात. आता मात्र महानगरात किंवा दाट वस्तीच्या गावांमधून काँक्रिटची जंगलं उभी राहतायत आणि तिथली वनश्री नष्ट होतेय. काल-परवापर्यंत उभी असलेली विशालदेही वड, पिंपळ, चिंच अशी कितीतरी झाडं तोडली जातात. त्याचा कुणाला ना खेद ना खंत! शक्य तेवढे सारे प्रयत्न करून निसर्गाची ही अमोल देणगी वाचवण्याचे प्रयत्न काही ठिकाणी होतात आणि त्यांचं कौतुक वाटतं.

मात्र अवघ्या काही दशकांपूर्वी महानगरांचा विस्तारही तुलनेने बेताचा होता. तिथे वनश्रीची अनेकविध रूपं पाहायला मिळायची. प्रसिद्ध साहित्यिक दुर्गा भागवत यांचे ‘ऋतुचक्र’ वाचलं तर त्याचा नक्की प्रत्यय येईल. प्रत्येक ऋतूच्या वर्णनाचं ते गद्यकाव्यच आहे. ते वाचताना आपण आपल्या परिसरात पूर्वी कधी पाहिलेल्या, अनुभवलेल्या वनश्रीची आठवण ताजी होते. मुंबईतच असलेल्या आमच्या राजावाडीत आमच्या लहानपणी मोठे डेरेदार वृक्ष आणि अनेक फुला-फळांच्या झाडांची मांदियाळी होती. काजू, नारळ, बदाम, गुलमोहर, रायआवळा, बिट्टी, आंबा, चिंच, फणस, वड, पिंपळ, जांभूळ, सांवरी, बाभूळ, शिरीष अशी किती नावं सांगावीत? शाळेत येता-जाता किंवा संध्याकाळी खेळताना या झाडा-माडांचा सहज परिचय व्हायचा. त्यांच्याशी एक प्रकारचं नातंच निर्माण व्हायचं.

चैत्रात वसंताचा बहराचा काळ. यावेळी ही सारी झाडं नव्या उत्साहाने ओथंबलेली वाटायची. आंब्या-फणसाची चाहूल त्यांच्या खांद्यावरूनच लागायची, पण सावरीचा कापूस लाल फुलांमधून प्रगटायचा आणि सोसाटय़ाच्या वाऱयाबरोबर सर्वत्र भिरभिरायचा. त्याच्याच तळाशी वाहणाऱया झुळझुळ ओढय़ाच्या दोन्ही काठांवर शतरंगी घाणेरीच्या झुडुपांवर नयनरम्य ‘रांगोळी’ दिसायची. त्याच्या काळय़ा फळातला गोडवा चाखता यायचा. चिंचा पाडणे आणि गाभुळलेल्या चिंचा चोखत हुंदडणे हा एक उद्योगच व्हायचा.

दूर कुठेतरी फुललेला चाफा, त्याचा गंध आसमंतात असा काही पसरायचा की त्या दरवळाने दुपारचं रणरणतं ऊनही सुगंधी व्हायचं. नाही म्हणायला आमच्या परिसरात पळसाच्या झाडाची मात्र उणीव होती. पुढे आकाशदर्शनाच्या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच मुंबईजवळच्या वांगणीला जाताना, बदलापूरनंतर डोंगरात फुललेला लालचुटूक पळस दिसायचा.

एकदा मुद्दाम आम्ही काहीजण त्या पळसवनात गेलो. ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ असं बिरुद लाभलेल्या पळासाची फुलं फारच सुंदर. पाकळय़ा अगदी मखमली. तिथले आदिवासी त्याची माहिती द्यायचे. तिथेच त्यांचा, पळसाच्या पानांचे द्रोण आणि पत्रावळी बनवण्याचा उद्योग चालायचा. तीन पानांचं मैत्र जपत आणि ‘पळासाला पाने तीन’ म्हण सार्थ करत बहरलेली पळसाची पानं खूपच उपयुक्त. त्याच्या फुलांपासून रंगही बनवला जायचा. कोणतंही कृत्रिम रसायन न वापरता.

त्याच रानात मग काळीशार, तुकतुकीत जांभळं आणि गोड रसाची करवंद मिळायची. स्थानिकांकडून त्याचे द्रोण भरभरून घ्यायचे आणि उन्हाची काहिली क्षणात नष्ट व्हायची. ऋतुचक्राशी नातं सांगणारे असे क्षण अनुभवणं फार मोलाचं ठरतं हे अशासाठी की या रानावनात पानाफुलांचं सौंदर्य, फळांची रानमेव्याची सुबत्ता आणि स्वच्छ हवेतला श्वास या गोष्टी तन-मन प्रफुल्लित करतात. या वर्षी अशी भटकंती शक्य झाली नाही. तरी निसर्गाची साद पुढच्या चैत्रातही येणारच. हजारो वर्षांचं ऋतुचक्र अव्याहत सुरूच राहणार. आपण त्याचा किती नि कसा आस्वाद घ्यायचा ते आपणच ठरवायचं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या