
>> दिलीप जोशी
गेल्या काही लेखांमधून आपण आपली सूर्यमाला आणि त्यातील ‘ग्रहसंकुला’ची वैशिष्टय़े याविषयी माहिती घेतली. अनेक सृष्टीचमत्कारांनी नटलेली, आपल्या पृथ्वीसह सूर्याभोवती फिरणारी ग्रहमाला ज्यापासून निर्माण झाली तो आपला ‘जनक’ तारा म्हणजे अर्थातच सूर्य. त्यामुळे विश्वातील एकूणच ताऱयांची माहिती घेताना ‘पहिलं नमन’ सूर्यालाच करायला हवं. पृथ्वीवरच्या आपल्या म्हणजे सजीवांच्या अस्तित्वासाठी सूर्य हा जन्मदाता तारा आणि नैसर्गिक उपग्रह चंद्र यांचं योगदान महत्त्वाचं आहे. सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्या त्रिवेणी सहचर्याविषयी अनेक मनोरंजक गोष्टी पुढे एखाद्या लेखात जाणून घेऊ. सध्या ‘तारे’ या विषयानिमित्ताने सूर्यापासून सुरुवात करूया.
गुरू आणि शनिसहीत अनेक प्रचंड ग्रहांना स्वतःभोवती गरगरत ठेवणारा आपला सूर्य आहे तरी केवढा? आपल्या पृथ्वीच्या तुलनेत तो 109 पट मोठा आहे. पृथ्वीच्या गोलकाची त्रिज्या सहा हजार चारशे किलोमीटर असेल तर सूर्याची त्रिज्या सहा लाख शहाण्णव हजार किलोमीटर एवढी प्रचंड आहे. यावरून त्याच्या आकाराची कल्पना करा.
खगोल अभ्यासकांसह अन्य कोणालाही अवकाशात दिवसा दिसणारा एकमेव तारा म्हणजे सूर्य. किंबहुना दिवस हा शब्दच सूर्याच्या दीप्तीवरून आला आहे. विराट विश्वातील ताऱयांचं स्वरूप जाणून घ्यायचं तर सूर्याचं अंतरंग जाणून घेतल्यावर थोडीशी कल्पना येईल. संपूर्ण विश्वाच्या तुलनेत सूर्य तसा अगदी साधारण तारा. आपल्याला तो अत्यंत महत्त्वाचा असला तरी विश्वरचनेत त्याचं महत्त्व बेताचंच. चौऱयाहत्तर टक्के हायड्रोजन आणि पंचवीस टक्के हिलियम तसंच एक टक्का इतर धातू वगैरे धारण करणारा ‘तेजोनिधी वायुगोल’ सूर्य हा एक तप्त तारा आहे. त्याच्या उष्णतेचा अनुभव उन्हाळय़ात सगळय़ा जगाला येत असतो. त्यात ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची भर पडल्याने पुढच्या काळातले उन्हाळे अधिक कडक असणार आहेत. ताऱयांचे रंग त्यांच्या तापमानावर ठरतात. निळे तारे अतितप्त, सूर्यासारखे पिवळे मध्यम आणि लाल तारे कमी तापमानाचे असतात. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सिअस, तर गाभ्यातील तापमान चौदा कोटी केल्विन इतकं असतं. तेथे एक ‘अणुभट्टी’च सतत धगधगते. त्यातून हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होऊन जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते त्यातून निर्माण झालेला प्रकाश आपल्यापर्यंत सवा आठ मिनिटात पोहोचतो. मात्र प्रकाशकण सूर्याच्या गाभ्यातून त्याच्या पृष्ठभागापर्यंत म्हणजे सहा ते सात किलोमीटर प्रवास करायला दहा लाख वर्षे घेतो आणि पृष्ठभागावरून तो निसटला की 15 कोटी किलोमीटर अवघ्या सव्वा आठ मिनिटांत पार करतो. हीच विश्वरचनेतील ‘गंमत’ अभ्यासली तर त्यामागचं विज्ञान लक्षात येतं.
रात्रभर आकाश निरीक्षण केलं तर नुसत्या डोळय़ांनी आपल्याला सहा हजार तारे दिसतात, तर सहा इंच व्यासाच्या दुर्बिणीतून दहा हजार. त्यापेक्षा शक्तिशाली दुर्बिण वापरली तर अर्थातच अधिकाधिक तारे, तारकापुंज वगैरेंचं दर्शन घडतं.
मात्र हे आपण पाहतो ते सर्व तारे आपल्या आकाशगंगा किंवा ‘मिल्की वे’ या दीर्घिकेमधले असतात. आपल्या या गॅलॅक्सीबाहेरच्या दीर्घिकांमधले तारेही असेच असतील. परंतु आपल्याच दीर्घिकेत सुमारे 100 अब्ज तारे आहेत आणि अशा अब्जावधी दीर्घिकांनी आपलं विश्व सजलेलं आहे. दीर्घिकांमध्ये तारे जन्म घेतात. मृग नक्षत्रातील तेजोमेघात अनेक सूर्यांच्या निर्मितीची क्षमता आहे. हे तारे आपल्यापासून किती अंतरावर आहेत ते मोजण्याच्या पद्धती आहेत. त्याचा ऊहापोह काहीसा क्लिष्ट होईल, परंतु त्यांची मोजमापे घेतली जाण्याइतकं आता खगोलविज्ञान पुढे गेलं आहे. पुढच्या लेखात ताऱयांच्या विविध रूपांची माहिती घेऊ.




























































