‘ऑल दि बेस्ट..’ अर्धा तास लेट; कल्याणच्या वाहतूककोंडीचा कलाकारांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहतूककोंडी ही कल्याण व डोंबिवलीकरांच्या जणू पाचवीलाच पुजली आहे. पावसाळ्यात तर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. या खड्यांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीचा आज ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकातील कलाकारांनादेखील चांगलाच फटका बसला. अत्रे नाट्यगृहातील प्रयोग अर्धा तास उशिरा सुरू झाला. वाहतूककोंडीतून मार्ग काढत नाटकातील कलाकार पोहोचले खरे पण त्यांनी पालिकेच्या ‘खड्डेमय’ कारभारावर जोरदार टिकास्त्र सोडले.

कल्याणमधील अत्रे नाट्यगृहात रोज वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग होतात. येथील नाट्यरसिकही डोंबिवली, कल्याण व आजूबाजूच्या गावातून येत असतात. कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात रोजच तुफान वाहतूककोंडी होत आहे. कल्याणमधील फूटपाथ फेरीवाल्यांनी गिळले असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना व नवा स्टेशन रोड येथून तर चालताही येत नाही. ही कोंडी फोडण्यास वाहतूक विभागाला सपशेल अपयश आले आहे.

वाहतूककोंडीचे हे संकट टळणार तरी केव्हा, असा सवाल कल्याण-डोंबिवलीकरांनी केला आहे. कल्याणमध्ये होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग काढत ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाच्या कलाकारांची गाडी कशीबशी अत्रे नाट्यगृहापर्यंत पोहोचली. पण त्यांना उशीर झाला होता. आयोजकांनी वारंवार घोषणा करून नाट्यरसिकांना याबाबतची माहिती दिली. प्रेक्षकांनीदेखील कलाकारांच्या प्रेमापोटी प्रतीक्षा केली. प्रत्यक्षात पडदा उघडला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. पण दुपारी चार वाजता सुरू होणारा प्रयोग अर्धा तास उशिराने सुरू झाला. खड्डे आणि वाहतूककोंडी यामुळे आता नाट्य कलाकार आणि रसिक यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

कॅण्टीन बंद असल्याने हाल
वाहतूककोंडीतून मार्ग काढत ऑल दि बेस्ट नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्लमध्ये पार पडला. अत्रे रंगमंदिरात तुफान गर्दी झाली होती. पण तेथील कॅण्टीन बंद असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना चहापाणी किंवा अल्पोपाहार यापैकी काहीही मिळाले नाही. आधीच कोंडी आणि त्यात कॅण्टीन बंद यामुळे नाट्यप्रेमींचा पारा चढला होता.