अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे अनेक नेते ताब्यात, जंतर-मंतरवर जाण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये जंतर-मंतर येथे आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपचे नेते संजय सिंह, सौरभ भारद्वाज यांच्यासह इतर नेत्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जंतर-मंतर परिसरातून 1500 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी जंतर-मंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. शुक्रवारी त्यांनी याबाबतची माहिती देताना, लोकशाही वाचवण्याच्या लढ्यात आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

घराबाहेर पडताच पोलिसांची कारवाई

सकाळपासूनच अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. केजरीवाल घराबाहेर पडताच पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवले. विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी पोहोचू न देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आपचे नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय, केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या सुमारे 150 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

‘संपूर्ण दिल्लीला जंतर-मंतर बनवा’; केजरीवाल यांचे आवाहन

पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. नेत्यांना ज्या ठिकाणी रोखले जाईल, त्याच ठिकाणी त्यांनी धरणे आंदोलन सुरू करावे आणि संपूर्ण दिल्लीला जंतर-मंतर बनवावे, असे केजरीवाल म्हणाले.

देशातील सर्व नागरिकांनी जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीला येण्यासाठी रेल्वे किंवा विमानाचा वापर करा; मात्र लोकशाही वाचवण्यासाठी दिल्लीमध्ये नक्की पोहोचा, असे त्यांनी सांगितले.

‘मोदी सरकारला मतांची चोरी करण्यापासून रोखले पाहिजे’

मतचोरीच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. काहीही झाले तरी मोदी सरकारला मतांची चोरी करण्यापासून रोखले पाहिजे, असे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.