
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘26/11’ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाब आणि टोळीला रोखण्यासाठी त्यावेळी दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. पण त्यानंतर मुंबईतल्या सुरक्षेचे गणित बदलले आणि नवीन सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात आल्या. परंतु क्यूआरटी, फोर्स वनसारख्या सुरक्षा एजन्सी तयार झाल्या असल्या तरी राज्यभरात आम्ही स्थानिक पातळीवर खबऱ्यांचे मजबूत जाळे पसरवले आहे. त्यामुळे प्रत्येक माहिती मिळवून प्रत्येकाच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्यात येते. म्हणून गेल्या तीन वर्षांत दहशतवाद्यांनी भरकटवलेल्या 120 तरुणांना आम्ही पुन्हा मुख्य प्रवाहात आणले, तर 240 युवकांना रोजगाराची दिशा दाखवल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
‘26/11’ च्या पार्श्वभूमीवर आम्ही विशेष अशी काहीच तयारी केलेली नाही. कारण आम्ही प्रत्येक दिवशी अॅलर्ट असतो. राज्यातील कानकोपऱ्यात काय चालू आहे याची दररोज माहिती घेतली जाते. प्रत्येक नागरिकाच्या हालचालीवर करडी नजर ठेवली जाते. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यात एटीएसला यश आले आहे. दहशतवाद्यांकडून नेहमीच हिंदुस्थानातील मुस्लिम युवकांची इस्लामच्या नावाने माथी भडकवली जातात. त्यांना काहीही सांगून भावनिक केले जाते. अशा 120 तरुणांना दहशतवाद्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढले होते, पण वेळीच त्या भरकटलेल्या 20 ते 40 वयोगटातील 120 तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आम्हाला यश आले आहे. जर ते तरुण दहशतवाद्यांमध्ये सामील झाले असते तर त्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकले असते, पण एटीएसने त्या तरुणांना वेळीच दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त केले. त्यात काही तरुणींचा समावेश असून बरेचजण विद्यार्थी आहेत. तर त्यात बेरोजगार आणि उच्चशिक्षित युवकांचादेखील समावेश असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
240 जणांना दाखवली रोजगाराची दिशा
एटीएसने त्या भरकटलेल्या 120 तरुणांना समाजाच्या प्रवाहात आणलेच, पण राज्यातील 240 तरुणांची हालचाल आम्हाला संशयास्पद वाटत होती. त्यामुळे त्या 240 तरुणांचे वेळीच ब्रेन वॉश करून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार कार्यक्रमाअंतर्गत आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील 26 तरुणांना बँकेकडून कर्जदेखील मिळवून दिले असून 30 तरुणांनी स्वयंरोजगार सुरू केल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
सोशल मीडियावर ते जाळे पसरवून बसलेत
हिंदुस्थानातील तरुण-तरुणींना धर्मांध बनवून त्यांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी परदेशात बसलेल्या दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर आपले जाळे पसरवले आहे. यू ट्यूब, फेसबुक मॅसेजेंर, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून दहशतवादी तरुण-तरुणींना हेरत आहेत. सुरुवातीला चांगले चांगले बोलून मग इस्लामच्या नावाने त्यांची माथी भडकविण्याचे काम करीत आहेत. जे तरुण दहशतवादी सांगतात ते ऐकू लागला की त्याला अफगाणिस्तान, पाकिस्तान, सीरिया आदी देशांत ट्रेनिंगसाठी बोलवतात. मग आपल्याच देशाविरोधात अतिरेकी कारवाया करण्यास त्यांच्याकडून सांगितले जाते, पण एटीएसने गेल्या तीन वर्षांत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. 120 तरुणांची त्यांच्या तावडीतून सुटका करून त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम केले आहे.
प्रेमाची जादू करून…
दहशतवादी पुरुष किंवा महिला डेटिंग अॅपच्या माध्यमातून हिंदुस्थानातील तरुणांच्या संपर्कात येतात. मग सुरुवातीला ओळख वाढवून प्रेमाच्या आणाभाका सुरू करतात. वेळप्रसंगी शारीरिक संबंध ठेवण्याचीदेखील व्यवस्था करून दिली जाते. यामुळे देशातील तरुण-तरुणी भावनिक होऊन अलगद दहशतवाद्यांच्या जाळ्यात सापडतात. त्यामुळे तरुण-तरुणींनी सोशल मीडियावरून कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला बळी पडता कामा नये असे एटीएसच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

























































