
मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ते आणि मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना गेवराईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमोल खुणे हे गेवराईहून धानोरा या आपल्या गावी जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या चार जणांनी अचानक त्यांच्यावर दगडफेक केली. यात एक दगड खुणे यांच्या डोक्याला लागला. जखमी अवस्थेत स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीवर हल्ला केल्याच्या प्रकरणात अमोल खुणे हे दोन वर्षे तुरुंगात होते. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर खुणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणासाठी काम सुरू केले.





























































