
अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसाचे निमित्त साधून फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान अमिताभ यांचे सर्वाेत्कृष्ट चित्रपट सिनेमागृहांत दाखवले जात आहेत. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री शबाना आझमी बिग बींचा ‘डॉन’ हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये पोहोचल्या होत्या. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की, अमिताभच्या ‘डॉन’ या सुपरहिट चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरू असून, थिएटर लोकांनी खचाखच भरले आहे. चाहते मोठ्या पडद्यावर चित्रपटाचा आनंद घेत आहेत. यादरम्यान, चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘मैं हूं डॉन’ सुरू आहे आणि लोक थिएटरमध्ये नाचताना दिसत आहे. शबाना यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. अनेक वर्षांनंतर, मोठ्या पडद्यावर आवडत्या अभिनेत्याचे हिट चित्रपट पाहण्याचा अनुभव अद्भुत होता, अशा कमेंट युजर्स देत आहेत.






























































