
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथची अनुपस्थिती… गेल्या काही महिन्यांतील सुमार प्रदर्शन… अन् समोर हिंदुस्थानचे तगडे आव्हान… ही पार्श्वभूमी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची… मात्र जस्टीन लँगरच्या मार्गदर्शनाखाली या नव्या दमाच्या ऑस्ट्रेलियन संघाने हिंदुस्थानात येऊन क्रिकेटचे रणांगण जिंकले आणि वर्ल्ड कप उंबरठ्यावर उभा असताना कमालीचा आत्मविश्वास मिळवला. हिंदुस्थानचा संघ मात्र अखेरच्या चाचणीत फेल झाला ही खेदजनक बाब आहे.
ग्लेन मॅक्सवेलच्या संस्मरणीय खेळाच्या जोरावर ट्वेण्टी-20 मालिका जिंकणार्या कांगारू संघाने वन डे मालिका 3-2 अशा फरकाने जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. उस्मान ख्वाजाचे धडाकेबाज शतक, पीटर हॅण्डस्कोम्बचे दमदार अर्धशतक, जाय रिचर्डसनची अष्टपैलू चमक, पॅट कमिन्स, ऍडम झाम्पाच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तब्बल 2009 सालानंतर हिंदुस्थानात मालिका विजयाचा झेंडा रोवला. हिंदुस्थानवर चार वर्षांनंतर मायदेशात मालिका गमावण्याची आपत्ती ओढवली. तसेच मायदेशात सलग सहा मालिका विजयानंतर हिंदुस्थान पहिल्यांदाच पराभूत झालाय.
76 धावांची सलामी
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ऍरोन फिंच व उस्मान ख्वाजा या जोडीने पहिल्या विकेटसाठी 76 धावांची आश्वासक सलामी दिली. पण विराट कोहलीने रवींद्र जाडेजाला गोलंदाजीस आणले आणि कांगारूंना पहिला धक्का बसला. त्याने ऍरोन फिंचला 27 धावांवर त्रिफळाचीत केले.
जोडी चमकली
ऍरोन फिच बाद झाल्यानंतर उस्मान ख्वाजा व पीटर हॅण्डस्कोम्ब या जोडीने 99 धावांची भागीदारी रचली. उस्मान ख्वाजाने कारकिर्दीतील व मालिकेतील दुसरे शतक झळकावले. त्याने 106 चेंडूंत दोन षटकार व दहा चौकारांसह 100 धावा फटकावल्या.
धावसंख्येला ब्रेक
उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन धावसंख्येला ब्रेक लागला. अखेरच्या 17 षटकांमध्ये त्यांना फक्त 97 धावाच त्यांना करता आल्या. मार्कस स्टोयनीसने 20 धावांची, ऍश्टन टर्नरने 20 धावांची, जाय रिचर्डसनने 29 धावांची खेळी साकारली. भुवनेश्वरकुमारने तीन बळी बाद केले.
स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो
धावांचा पाठलाग करणार्या हिंदुस्थानी संघातील स्टार खेळाडूंना अपयशाचा सामना करावा लागला. शिखर धवन (12 धावा), विराट कोहली (20 धावा), रिषभ पंत (16 धावा), विजय शंकर (16 धावा) व रवींद्र जाडेजा (0) यांच्याकडून सपशेल निराशा झाली. सलामीवीर रोहित शर्माने 56 धावा करीत थोडीफार झुंज दिली. त्यालाही मोठी खेळी करता आली नाही.
केदार, भुवी लढले पण…
हिंदुस्थानचा संघ अडचणीत सापडला असताना केदार जाधव व भुवनेश्वरकुमार या जोडीने विजयाची आशा दाखवली. दोघांनी 91 धावांची भागीदारी केली. मात्र त्यांना संघाला विजयी पंच मारून देता आला नाही. पॅट कमिन्सने भुवनेश्वरकुमारला 46 धावांवर तर जाय रिचर्डसनने केदार जाधवला 44 धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. ऍडम झाम्पाने तीन, तर कमिन्स, रिचर्डसन व स्टोयनीस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.





























































