भारतीय कामगार सेनेच्या दणक्यामुळे ‘एविस इंडिया मोबिलिटी’ने कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले

चांदिवली येथील एविस इंडिया मोबिलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेमध्ये बहुसंख्येने कर्मचारी सहभागी होत असल्यामुळे सूडबुद्धीने संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून काढणारे व्यवस्थापन भारतीय कामगार सेनेच्या दणक्यानंतर अक्षरशः नमले आहे. भारतीय कामगार सेनेने आज कंपनीच्या कार्यालयावर धडक देत व्यवस्थापनाला पळताभुई थोडी केल्याने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. यामुळे समर्थ कामगार सेनेचा ‘डावही उधळला’ गेला.

महाराष्ट्र समर्थ कामगार सेनेमधील बहुतांश कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस सचिन अहीर, चिटणीस संदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला. मात्र, याचा राग मनात धरून एविस इंडिया मोबिलिटी सोल्युशन व्यवस्थापनाने दोन कर्मचाऱयांना जाणीवपूर्वक कामावरून काढून टाकले. याची गंभीर दखल घेत संदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज कर्मचाऱयांनी व्यवस्थापनावर धडक देऊन प्रशासनाच्या अन्यायाबाबत जाब विचारला. कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱयांना तातडीने कामावर घेण्याची मागणी करण्यात आली. यामुळे हादरलेल्या व्यवस्थापनाने दोन्ही कर्मचाऱयांना कामावर घेतले. याबद्दल सर्व कामगारांकडून भारतीय कामगार सेनेचे आभार मानण्यात आले.

व्यवस्थापनाच्या मुजोरीला चाप

एविस इंडिया मोबिलिटी सोल्युशनमधील महाराष्ट्र समर्थ कामगार सेनेच्या सदस्यांनी शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेत प्रवेश केल्यानंतर कर्मचाऱयांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठीच संबंधित कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र भारतीय कामगार सेनेच्या दणक्यामुळे व्यवस्थापनाची मुजोरी आणि दडपशाहीला चाप बसणार असल्याचे संदीप राऊत यांनी सांगितले.