दाती महाराजांच्या पुरुषत्वाची चाचणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महिलेवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दिल्लीतील शनिधामचे संस्थापक दाती महाराज यांच्या पुरुषत्वाची चाचणी केली जाईल अशी शक्यता आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान दाती महाराज यांना अश्रूही अनावर झाले आणि एक नागा साधू कधीच महिलेबाबत तसा विचार करू शकत नाही असा दावा त्यांनी केला आहे. तसेच आपल्यावर करण्यात आलेले बलात्काराचे आरोप निराधार असल्याचे दाती महाराज यांनी म्हटले आहे.

दोन वर्षापूर्वी दाती महाराजांनी शनिधाममध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला. महिलेने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यामुळे दाती महाराज यांच्या छतरपूरसह राजस्थान येथील पाली आणि नेपाळ येथी आश्रमांवर छापे टाकले. त्यानंतर दाती महाराज यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान दाती महाराज यांनी ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी आपण छतरपूरमधील आश्रमामध्ये उपस्थित नव्हतो असे सांगितले. त्यांनी हा दावा करताना पोलिसांना पुरावेही दिल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, फिर्यादी महिलेने आरोप केला आहे की तिच्यासारख्या अन्य काही महिला आश्रमामध्ये आहेत, ज्यांचे दाती महाराजांनी लैंगिक शोषण केले आहे. परंतु दाती महाराजांच्या समर्थकांनी त्यांना धमकी दिल्याने त्या गप्प आहेत. या आरोपांमधील तथ्य तपासण्यासाठी पोलीस आश्रमामधील दैनंदिन काम पाहणाऱ्या महिलेची चौकशी करण्याची शक्यता आहे. ‘दाती महाराज ‘सेवा’ करण्याच्या नावाखाली खोलीमध्ये बोलावत होते. महिला खोलीमध्ये गेल्यानंतर दाती महाराज आणि त्यांचे समर्थक तिचे जबरदस्ती लैंगिक शोषण करत होते. मी महाराजांची मोठी भक्त होती आणि सेवा करण्यासाठी खोलीमध्ये जाण्याचे कबूल केले, परंतु दाती महाराजांनी याचा गैरफायदा घेतला’, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.