
सामना ऑनलाईन । विस्कोसिन
कामाला जाणाऱ्या महिला मोठ्या विश्वासाने बेबी सिटींगमध्ये बाळाला ठेवून जातात. मात्र याच विश्वासाला तडा जाणारी एक घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेतील विस्कोसिन शहरात एका बेबी सिटरने दोन महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्या महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारिसा टाईटसोर्ट असे त्या महिलेचे नाव असून ती सहा महिन्याची गरोदर आहे.
पाच मुलांची आई असलेल्या मारिसावर यापूर्वी 11 महिन्याच्या मुलीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर न्यायालयाने तिला बेबी सिटींग चालवण्यापासून रोखले होते. मात्र तरीही मारिसा ही गपचूपपणे बेबी सिटींग चालवत होती. यावेळेस तिच्याकडे दोन महिन्यांचे बाळ व त्याचा तीन वर्षांचा भाऊ बेबी सिटींगसाठी यायचे. 18 ऑक्टोबर रोजी मारिसाकडील ते दोन महिन्यांचे बाळ खूप रडत होते. त्यामुळे मारिसाने त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्या बाळाच्या डोक्याला गंभीर इजा झाली व त्या बाळाचा मृत्यू झाला.
बाळाला ठार मारल्यानंतर मारिसाने काहीही न झाल्यासारखे बाळाच्या आईला फोन केला व बाळाला घरी आणून सोडत असल्याचे सांगितले. तिने बाळाला मोठ्या कपड्यात गुंडाळले व त्याच्या आईला बाळ झोपले सांगून त्यांच्याकडे ते सोपवले. काही वेळाने बाळ जराही हालचाल करत नसल्यामुळे आईने त्याला तपासले असता बाळाचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तत्काळ बाळाला रुग्णालयात नेले मात्र बऱ्याच तासापूर्वीच बाळाच मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर बाळाच्या आईने मारिसाविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी मारिसाला अटक केली. या प्रकरणी न्यायालयाने मारिसाला दोषी ठरविले असून लवकरच तिला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.





























































