
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
हिंदुस्थानी कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत पुन्हा कमाल केली आहे. या वर्षात पाच पदके जिंकणार्या 24 वर्षीय बजरंग पुनिया यूडब्ल्यूडब्ल्यूच्या यादीत 96 गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. दुसर्या क्रमांकावर असेल्या कुस्तीपटूपेक्षा बजरंग 30 गुणांच्या अंतराने पुढे आहे. क्युबाचा एलेजांद्रो एनरिक व्लाडेस टोबियर 66 गुणांसह दुसर्या स्थानावर विराजमान आहे. रशियाचा अखमद चाकेइव 62 गुणांसह तिसर्या स्थानावर आहे. जगातील टॉप टेन कुस्तीगीरांत स्थान पटकावणारा पहिला हिंदुस्थानी मल्ल म्हणून बजरंगच्या नावाची नोंद झाली आहे.
बजरंगसाठी यंदाचा हंगाम शानदार ठरला आहे. तो बुडापेस्ट येथे होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पात्र होणारा एकमेव हिंदुस्थानी कुस्तीपटू ठरला आहे. बजरंगची ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी कामगिरी आहे. बजरंगने आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
जगातील पहिल्या दहा कुस्तीपटूंमध्ये स्थान मिळवणारा बजरंग हा एकमेव हिंदुस्थानी मल्ल आहे. महिला गटात मात्र हिंदुस्थानच्या पाच महिला कुस्तीपटूंनी आपापल्या गटांमध्ये अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे. पूजा ढांडा 57 किलो गटामध्ये 52 गुणांसह सहाव्या स्थानावर विराजमान आहे. तर रितू फोगाट 59 किलो गटामध्ये 29 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
“आपण जगातला सर्वोत्तम कुस्तीपटू बनावं असं प्रत्येक कुस्तीगिराचे स्वप्न असतं. पण जागतिक चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावून हे सर्वोत्तम स्थान मिळालं असतं तर मला आणखी आनंद झाला असता. आता मी खूप मेहनत घेत आहे आणि हा सर्वोत्तम रँक पुढील वर्षीही टिकवण्याचा मी प्रयत्न करेन. माझी टॉपची रँकिंग मला टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळवून देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा मला विश्वास आहे.”– बजरंग पुनिया






























































