
काल राणा भीमदेवी थाटात ‘दंडवत – दंडुका’ आंदोलन करताना राजकीय नेत्यांवर बेछूटपणे चिखलफेक करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांनी आज चोवीस तासांतच ‘घालीन लोटांगण’ म्हणत ‘दंडवत’ घातला. ‘आपण बोलण्याच्या ओघात अनावधानाने बोललो’ असे सांगत त्यांनी सर्वांची माफी मागितली. दरम्यान, बंडातात्या यांच्या बेताल वक्तव्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटले असून, त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तर, राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश सातारा पोलिसांना देण्यात आले आहेत.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने काल साताऱ्यात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना हभप बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली. त्यांनी राजकीय नेत्यांवर अनेक आक्षेपार्ह विधाने केली. बंडातात्या यांनी केलेल्या या आक्षेपार्ह विधानांचे संतप्त पडसाद आज सर्वत्र उमटले. साताऱ्यात आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने पोवई नाक्यावर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी रजनी पवार, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या संगीता साळुंखे, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, काँग्रेसच्या धनश्री महाडिक, रजिया शेख यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांच्या विरोधात कालच सातारा शहर पोलीस ठाण्यात विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे आज महिलांविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज दुपारी बंडातात्या कराडकर सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी, जाबजबाब ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस मुख्यालयाच्या परिसरासह शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
बदनामीचा खटला दाखल करणार – सहकारमंत्री
बंडातात्या कराडकर असे का बोलले हे मलादेखील समजले नाही. कोणताही आधार नसताना त्यांनी वक्तव्ये केली. माझा मुलगा दारू पितो असे म्हणाले. त्यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा असावा, असे मला वाटते. माझ्या मुलाने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी वकिलांची भेट घेतली आहे. आम्ही त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहोत, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
बंडातात्यांना यापुढे मारुतीबुवा मठात प्रवेश नाही
कराड – बंडातात्या यांचे मूळ प्रकाश सदाशिव जंत्रे नाव असणारा फलक कराडच्या मारुती बुवा मठाच्या शेजारी लावून आज कराडकरांनी बंडातात्या यांचा तीव्र निषेध केला, तर त्यांच्या बॅनरला जोडे मारण्यात आले. मूळचे कराडचे असणारे बंडातात्या यांचे वास्तव्य कराडमधील मारुतीबुवा मठामध्ये होते. कराड येथे मारुतीबुवा कराडकर मठ ट्रस्ट यांच्या वतीने सदर घटनेचा निषेध करण्यात आला. मारुतीबुवा मठात वारकरी आणि कराडकरांचा बंडातात्यांच्या पोष्टरला जोडे मारत निषेध केला. बंडातात्यांनी कराडच्या मारुतीबुवा मठाचे वाटोळे केले, याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. दरम्यान, बंडातात्यांना यापुढे मारुतीबुवा मठात प्रवेश नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.



























































