
बँक खातेदारांची गोपनीय माहिती चोरी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला गुजरातमधील वापी शहरातून अटक केली. त्याने पुण्यातील आरोपींना मोबाईल डेटा पुरविण्याचे काम केले होते. न्यायालयाने आरोपीला पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दिलीप लालजी सिंग (वय 30, रा. वापी, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
खासगी बँकांमधील नागरीकांच्या सक्रीय व निष्क्रीय बँक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती आरोपींनी काही व्यक्तींच्या मदतीने चोरली होती. गोपनीय माहिती पुण्यातीलच काही व्यक्तींना विक्री करण्यासाठी आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने 16 मार्चला त्यांना अटक केली होती. आरोपींकडे असलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये तब्बल 225 कोटी चोरी करणार होते. त्यापुर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी परराज्यात जाऊन काही जणांना अटक केली होती. आरोपींना मोबाईल डेटा पुरविण्याचे काम गुजरातमधील वापी येथील एकाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
त्यानुसार पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचे पथक वापीमध्ये गेले होते. त्यानंतर पोलिसांनी सिंगला अटक केली.





























































