स्थानिकांना विश्वासात घ्या! शरद पवारांच्या सल्ल्यानंतर उदय सामंतांनी बोलावली तातडीची बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारसूमध्ये रिफायनरीसाठी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना आणि बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना मंगळवारी स्थानिकांच्या कडवट विरोधाला सामोरे जावे लागले होते. रस्त्यावर झोपत स्थानिकांनी सरकारी गाड्या अडवल्या होत्या. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना म्हटले की मंगळवारी यासंदर्भात आपले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणे झाले होते. फोनवर झालेल्या या चर्चेमध्ये सामंत यांनी बारसूमध्ये जमीन अधिग्रहणाचे काम सुरू नसून तिथे माती तपासणीचे काम केले जात असल्याचे सांगितले.

शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या संवादाबाबत माहिती दिली. ‘आम्ही तिथे अधिग्रहणाचे काम करत नसून, तिथल्या मातीची तपासणी करत आहोत. हे काम करण्याला लोकांचा विरोध होता, हा विरोध आता नाहीये.’ असे सामंत यांनी सांगितल्याचे पवार यांनी म्हटले. सामंत यांनी चर्चेदरम्यान हा प्रकल्प बारसूमध्येच व्हावा अशी सरकारची भूमिका असल्याचे म्हटले. यावर पवार यांनी त्यांना सांगितले की,’घाईने काही करू नका, तिथे प्रकल्पाला विरोध करणारे आणि शासकीय अधिकारी यांची बैठक घ्या.’ यावर सामंतांनी तातडीने बैठक बोलावण्याचे मान्य केले. या बैठकीला आंदोलकांचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी घटनास्थळी बसतील आणि विचारविनिमय करतील आणि चर्चेचा निष्कर्ष ते सरकारला कळवतील. यानंतरही काही प्रश्न असतील तर चर्चेतून ते सुटावेत किंवा अन्य पर्याय आहेत की याची चाचपणी व्हावी असे पवार यांनी म्हटले. प्रकल्प होत असताना स्थानिकांना विश्वासात घ्या. विरोध असल्यास तो का आहे हे समजून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा असा सल्ला पवार यांनी दिला आहे.

खारघर दुर्घटनेबाबत बोलताना पवार यांनी म्हटले की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समितीचा उपयोग होणार नाही. एक सदस्य हा शासकीय अधिकारी आहे. तिथे निर्णय ज्यांनी घेतले त्यात राज्याच्या प्रमुखांपासून अन्य सहकारी त्यात आहे. राज्याच्या प्रमुखांचा सहभाग असेल अशी जर तक्रार असेल तर त्याची चौकशी एक अधिकारी करू शकत नाही, म्हणून त्यासाठी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.