राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचा कायापालट करणार! कोचेसचा करार न वाढवण्याचा निर्णय

बीसीसीआय राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचा कायापालट करण्याचा विचार करीत आहे. याच पार्श्वभूमीवर 2019 सालामध्ये एक वर्षासाठी करार करण्यात आलेल्या विविध कोचेसचा करार न वाढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात येणार आहे. कोचेसना पदावर पुढे न ठेवण्याचे बीसीसीआयकडून असे कारण पुढे करण्यात आले आहे की, 2019 सालामध्ये एक वर्षासाठी करार करण्यात आलाय. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून सर्व ठप्प आहे. पाच महिने या कोचेसकडून काही काम झालेले नाही, तर मग त्यांचा करार वाढवून उपयोग काय? अशा प्रकारचे वृत्त मीडियामधून पुढे आले आहे.

हे पदावर कायम राहतील

राहुल द्रविड यांच्याकडे राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीच्या प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ते पदावर राहतील. त्यांच्या सोबत फिजिओथेरेपिस्ट आशीष कौशिक, ट्रेनर आनंद दाते, ऑपरेशन्स मॅनेजर क्षेमल वायंगणकर, एज्युकेशन हेड सुजित सोमासुंदर यांनाही कायम ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासह नरेंद्र हिरवाणी (फिरकी गोलंदाजी), अभय शर्मा (यष्टिरक्षण), पारस म्हांब्रे (19 वर्षांखालील प्रशिक्षक) यांनाही पदावर कायम ठेवण्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत.

यांना धक्का बसण्याची शक्यता

हिंदुस्थानातील विविध वयोगटांतील संघांसाठी काम करणाऱ्य़ा काही व्यक्तींचा करार न वाढवण्यासाठी बीसीसीआय पाऊल उचलणार आहे. यामध्ये शिवसुंदर दास, मन्सूर अली, शुभादीप घोष, टी. दीलीप, राजीव दत्ता, अपूर्वा देसाई, शितांशू कोटक यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या