
‘बेस्ट’ प्रशासनाने सुरक्षा अनामत रकमेच्या नावाखाली दोन बिलांची रक्कम आगाऊ स्वरूपात भरण्याचे फर्मान काढल्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ‘बेस्ट’ प्रशासनाच्या ‘जुलमी वसुली’विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शिवडीत जोरदार ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले.
सुरक्षा अनामत रक्कम जमा करण्यासाठी ‘बेस्ट’ इलेक्ट्रिक विभागाकडून ग्राहकांना बिलासोबतच सरासरी दोन बिलांच्या रकमेइतकी अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून भरण्याचे निर्देश दिले आहेत. आधीच गेली दोन वर्षे कोरोनामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली असताना अचानक ‘आगाऊ’ बिल भरणार कसे, असा सवाल वीज ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडी विधानसभा क्षेत्रात आणि शिवसेना शाखा क्र. 206च्या वतीने स्वर्गीय निवांत घेरडे चौक शिवडी नाका या ठिकाणी ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. यावेळी ‘बेस्ट’ने पाठवलेल्या अनामत रकमेच्या बिलांची होळी करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, महिला उपविभाग संघटक श्वेता राणे, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, महिला शाखा संघटक शुभदा पाटील, शाखाधिकारी रोहित गायकवाड यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी, वीज ग्राहक उपस्थित होते.





























































