
सामना ऑनलाईन, मुंबई
‘बेस्ट’च्या संपात उतरलेल्या कामगारांचा नऊ दिवसांचा पगार कापण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. संपकऱ्यांचा पगार कापला जाणार नाही अशी चुकीची माहिती शशांक राव यांनी कामगारांना दिली होती, मात्र न्यायालयाच्या आदेशात असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे नियमानुसार त्यांचा जानेवारीचा पगार कापण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असल्याचे समजते. मोठा पगार घेणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना याचा फटका बसणार आहे.
बेस्ट कामगार कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी 8 जानेवारीपासून संप केला होता. हा संप तब्बल नऊ दिवस चालला. या काळात परिवहन विभागाचे 27 कोटींचे नुकसान झाले. बेस्टचे 30 हजार कर्मचारी संपावर गेले होते. नऊ दिवसांच्या या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले. याशिवाय बेस्ट उपक्रमाचे दररोज पावणेतीन ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. संप बुधवारी दुपारी मागे घेतल्यानंतर सायंकाळपासून बेस्टसेवा पूर्ववत झाली. संप काळात कर्मचाऱ्याला सेवेतून कमी केले जाणार नाही आणि कोणाचेही वेतन कापले जाणार नाही असेही प्रशासनाने स्पष्ट केल्याचे संघटनांनी सांगितले होते, मात्र आता प्रशासनाने नियमानुसार पगार कापण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. त्यामुळे फेब्रुवारीत मिळणारा पगार कापून दिला जाणार आहे.
आधीच सुट्टी टाकलेले कर्मचारी वाचणार
जे आधीपासून सुट्टीवरून होते ते या कारवाईतून वाचणार आहेत. मात्र संपाच्या काळात गैरहजर राहिलेल्यांवर पगार कपातीची कारवाई होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.




























































