
सामना ऑनलाईन, मुंबई
जय जय रामकृष्ण हरी, रूप पाहता लोचनी, विठ्ठल सावळा आणि शिवसेना प्रमुखांच्या गजराच्या भक्तिरसात कुरारवासीय न्हाऊन निघाले. निमित्त होते शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य चक्री भजन स्पर्धेचे. दोन दिवसीय भजन स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या संकल्पनेतून कुरार व्हिलेज तानाजीनगर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन आमदार सुनील प्रभू यांनी केले. माजी नगरसेवक सुनिल गुजर आणि शिवसेना शाखा क्रमांक 36 व 37 आयोजित ही स्पर्धा कलाकारांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक तुळशीराम शिंदे, नगरसेविका विनया सावंत, प्रशांत कदम, विष्णू सावंत, पूजा चौहान, रीना सुर्वे, सुनिल गुजर, काशिनाथ (भाई) परब, प्रदीप निकम, तुकाराम कडू, कृष्णा देसाई, कृष्णाकांत सुर्वे, सानिका शिरगावकर, अशोक राणे, राजू घाग, मनोहर राणे आदी उपस्थित होते.
दोन दिवस भजन उत्सव
दोन दिवस चालणाऱ्या या भजन स्पर्धेत वीस भजन मंडळे आपली कला सादर करणार आहेत. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या मंडळांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट गायक, पखवाज वादक, हार्मोनियम वादक झांजवादक यांचाही गौरव करण्यात येणार आहे. मालाड येथील ज्येष्ठ भजनी बुवा अनंत पांचाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात झाली.

































































