
सामना ऑनलाईन । मुंबई
भारत पेट्रोलियम यांनी पुरुषांच्या तर पश्चिम रेल्वे यांनी महिलांच्या गटात जबरदस्त कामगिरी करीत विक्रोळी येथे पार पडलेल्या व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या जेतेपदावर दिमाखात मोहोर उमटवली. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने ‘आमदार सुनील राऊत चषक’ या प्रतिष्ठेच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभला. आयोजक व शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. यावेळी महिला आघाडीप्रमुख रश्मी पहुडकर,उपशाखाप्रमुख हेमंत रासम या मान्यवरांची उपस्थिती होती.
भारत पेट्रोलियम व एअर इंडिया यांच्यामधील लढत रोमहर्षक झाली. अजिंक्य कापरे व अस्लम इनामदार यांच्या तूफानी चढायांनी कबड्डीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेले. भारत पेट्रोलियमच्या गिरीश इरनाकच्या अफलातून पकडींनी सामन्यात रंगत आणली. अखेर भारत पेट्रोलियमने एअर इंडियावर 26-25 अशा अवघ्या एका गुणाने सनसनाटी विजय मिळवला. याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारत पेट्रोलियमने देना बँकेला 35-25 अशा फरकाने तर एअर इंडियाने युनियन बँकेला 35-21 अशा फरकाने हरवत आगेकूच केली.
महिलांच्या गटात पश्चिम रेल्वेने डब्ल्यूटीई इन्फ्रास्ट्रक्चर या संघावर 36-32 अशा फरकाने विजय मिळवत झळाळता करंडक पटकावला. सोनाली शिंगटे व इश्वरी कोंढाळकर यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर पश्चिम रेल्वेने जेतेपद साकारले. डब्ल्यूटीई इन्फ्रास्ट्रक्चरकडून स्नेहल शिंदे हिने आपली चुणूक दाखवली. मात्र तिची झुंज अपयशी ठरली. दरम्यान, याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत पश्चिम रेल्वेने ठाणे मनपाचा तर डब्ल्यूटीई इन्फ्रास्ट्रक्चरने देना बँकेचा धुव्वा उडवत घोडदौड केली होती. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.





























































