
>> द्वारकानाथ संझगिरी
न्यूझीलंडमध्ये एका माथेफिरूने एका मशिदीत शिरून जे हत्याकांड केले ते थरकाप उडवणारे होते. जिथे हे हत्याकांड घडले ते शहर आहे ख्राईस्टचर्च. पुढच्या महिन्यात तिथे आम्ही सहकुटुंब जायचा विचार करतोय. आजपर्यंत न्यूझीलंड हा मला कधी असुरक्षित देश वाटलाच नाही, पण आता मला पटलेय की, जगात सुरक्षित अशी कुठलीच जागा नाही. माणूस हाच माणसाचा वैरी आहे. जंगली प्राणी आजही हिंस्र आहेत. सुरुवातीला त्यांच्यात वावरणारा माणूस सुसंस्कृत झाला, पण त्याच्यातला हिंस्र पशू नामशेष झाला नाही. तो धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, वर्णाच्या नावाने वर उफाळून येतो. हिंस्र पशूच्या पंजा, नखे, सोंड, दात वगैरेपेक्षा किती तरी संहारक शस्त्र माणसातल्या पशूच्या हातात आली. त्यामुळे माणूस हिंस्र बनतो तेव्हा तो जंगली पशूपेक्षा जास्त संहारक ठरतो.
‘जन्नत’साठी हे आजचे आयुष्य फुंकून टाकणाऱया इस्लामी अतिरेक्यांची संख्या जगभर वाढतेय. ते जगात कुठेही बॉम्ब टाकतात, बेछूट गोळीबार करतात. त्यात निरपराध माणसे मारली जातात. अचानक माथे भडकले की माथेफिरूपणा होतो, पण जेव्हा ही गोष्ट थंड डोक्याने होते, त्याचे निर्लज्ज चित्रण केले जाते तेव्हा द्वेष किती मुरलाय याची जाणीव होते.
मला एक जुना प्रसंग आठवतोय. 1983 सालचा. तेव्हा पाश्चात्त्य जग आताएवढे असुरक्षित नव्हते, पण त्यावेळी इंग्लंडमध्ये ‘स्किन हेडस्’ नावाची एक जमात होती. डोके भादरलेली ही तरुण व काही मध्यमवयीन मंडळी अतिरेकी उन्मत्त विचाराने, नाझी तत्त्वाने, वर्णश्रेष्ठत्वाने भारलेली असायची. त्यांना हिंदुस्थानी-पाकिस्तानी गव्हाळ आणि काळ्या त्वचेचा तिटकारा होता. मला वाटते, तिटकाऱयापेक्षा ‘द्वेष’ हाच शब्द योग्य! सर्वसाधारण हिंदुस्थानी-पाकिस्तानी मंडळींना ते ‘पाकी’ म्हणत. अजूनही काही वेळा इंग्लंडमध्ये हिंदुस्थानींना ‘पाकी’ म्हटले जाते. ती शनिवारची रात्र आठवली. मी टय़ूबमधून हॉन्सलोला परतत होतो आणि त्या स्किन हेडस्च्या तावडीत टय़ूबमध्ये सापडलो. त्यांनी शारीरिकदृष्टय़ा मला हात लावला नाही, पण ते वाटेल ते बोलत होते. वैयक्तिक, राष्ट्रीय, धार्मिक आगपाखड केली. त्यामागचा हेतू एकच, मी प्रत्युत्तर द्यावे आणि मग त्याचे निमित्त करून मला चोप द्यावा. मी इतका शांत बसलो की गौतम बुद्धाने मला त्याचा शिष्योत्तम केले असते. दोन स्टेशनांनंतर मी गाडीतून उतरलो. उतरताना मी उतरू नये यासाठी त्यांनी अडचणी निर्माण केल्या, पण चेहऱयावर देव आनंदचे स्मित ठेवून मी शिताफीने मार्ग काढला.
मी स्टेशनवर उतरलो आणि पुढच्या गाडीत डब्यातली गर्दी पाहून शिरलो. ऐन थंडीत मला घाम फुटला होता. लोकशाहीवादी, उदारमतवादी इंग्लंडचे हे रूप नवे होते आणि ते पाहून मला वाईट वाटले होते.ब्रिटिशांनी इतरांवर धार्मिक, वर्णश्रेष्ठत्वावरून अनन्वित अत्याचार केले. काळ्या गुलामांना तर जनावरांसारखे वागवले, पण नंतर बदलत्या काळाबरोबर त्यांच्यातला उदारमतवाद उफाळून आला. आपल्या या काळ्याकुट्ट अत्याचारांबद्दल त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्यांनी माफीही मागितली, पण सर्वच माणसे बदलत नाहीत. येथील जगात हलकीशी का होईना, धर्म आणि वर्णद्वेषाची लाट आहेच. आता लंडनमध्ये बस किंवा ट्रेनमध्ये अस्सल ब्रिटिश माणूस अल्पसंख्याक झालाय असे वाटते, पण एक जमाना होता की, जेव्हा बस किंवा ट्रेनमध्ये ब्रिटिश असतील तर माझ्या बाजूची रिकामी जागा शेवटी भरायची आणि तिथे बसणाऱया माणसाच्या चेहऱयावर ‘हेचि फल काय मम तपाला’ अशी भावना असायची.
इंग्लंड, युरोपमध्ये स्थलांतरित खूप वाढले आहेत. त्यात सीरियाच्या पेटलेल्या वणव्यात भाजलेली मंडळी युरोपात आश्रयाला येत आहे. त्यामुळे इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये फिरताना आता इतर देशाचे लोक दिसतात. किमान इंग्लंडची आकडेवारी पहा. 2001 साली इंग्लंडमध्ये लोकसंख्येच्या 8.3 टक्के माणसे ही इंग्लंडबाहेर जन्मलेली होती. तो आकडा ऑस्ट्रेलिया (23 टक्के), कॅनडा (19.3 टक्के), यूएसएचा (12.3 टक्के) होता, पण ऑस्ट्रेलिया, कॅनडाने आपली दारे स्थलांतरितांसाठी खुली केली होती आणि अमेरिकेत कुणी कुणाला स्थलांतरित म्हणायचे हा प्रश्न आहे. पण 2017 ला इंग्लंडची टक्केवारी 8.3 टक्क्यांवरून 14.4 टक्क्यांवर आली. कारण आता इंग्लंडनेही दाराची फट उघडी ठेवलीय, पण लंडनची आकडेवारी थक्क करणारी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लंडनची ब्रिटिशांची संख्या लोकसंख्येच्या फक्त 44.9 टक्के होती. लंडनच्या लोकसंख्येच्या 37 टक्के लोकसंख्या ही इंग्लंडबाहेर जन्मलेली होती आणि 24.5 टक्के लोकसंख्या युरोपबाहेर जन्मलेली होती. आता 2019 साल उजाडलंय. त्यामुळे 44.9 टक्क्यांहून ब्रिटिशांचे प्रमाण खाली नक्की घसरले असेल. लंडन बहुरंगी, बहुढंगी का दिसते त्याचे हे कारण आहे.
‘अफू’ची शेती जोरात
युरोप, ऑस्ट्रेलिया आदी देश वर्णश्रेष्ठत्वाला मूठमाती देऊन बहुरंगी होते आहेत ही चांगली गोष्ट आहे, पण मी आधी म्हटलेय ती धर्म आणि वर्णद्वेषाची सौम्य लाटही मोठी होतेय. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंडमध्ये प्रस्थापितांनी इतर वर्णाच्या, धर्माच्या मंडळींवर केलेल्या हल्ल्यांची संख्या वाढायला लागली आहे. मुख्य म्हणजे बंदुकीतून सुटणाऱया गोळीला समोरचा माणूस अपराधी आहे की निरपराधी ते ठाऊक नसते. तो उदारमतवादी आहे की नाही हे ती गोळी जाणून घेत नाही. त्याचा धर्म त्या गोळीला कळत नसतो. तो हिंदू आहे की मुस्लिम, बौद्ध किंवा हिंदुस्थानी, पाकिस्तानी, श्रीलंकन की बांगलादेशी हे त्या गोळीला कळत नाही. तुम्हाला जात्यंधांवर राग आहे हेसुद्धा ती गोळी समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसते. ती फक्त वेध घेते. हे भयानक आहे. 1983 साली जर्मनीत ऐतिहासिक स्थळ पाहताना एका गाईडला मी हिटलरबद्दल विचारले होते. ती महिला गाईड मला म्हणाली, ‘‘त्या माणसाचा उच्चारही आम्हाला आवडत नाही. आम्ही त्याला कधीच पुरून टाकलंय.’’ पण त्याच्या थडग्यावरची माती आता पुन्हा उपसली जातेय. शेवटी मार्क्स म्हणतो तेच खरे, ‘‘धर्म ही अफूची गोळी आहे.’’ जगात ‘या’ ‘अफू’ची शेती जोरात आहे.





























































