
सामना प्रतिनिधी । नगर
शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालले आहे. त्यामुळे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. लुटमार आणि चोरीच्या घटनांमुळे नगर शहर असुरक्षित बनले असल्याचे चित्र आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर कसलाच वचक राहिला नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवास आणि मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. तरी चोरीच्या घटनांना आळा घालून शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वकिल आघाडीने केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतच भाजपाने जिल्ह्यात कायद्याचा बोजबारा उडाला असल्याचे एक प्रकारे कबुल करून सत्ताधार्यांना घरचा आहेरच दिला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, नगर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या आहे. याचा आलेख कमी न होता तोच दिवसेंदिवस वाढतच आहे. नगर शहरात सावेडी, कापडबाजार, केडगाव, मार्केटयार्ड व इतर असा कोणताही भाग नसेल की, त्या भागात चोरांची दहशत नाही. रस्त्यातून जाण्याऱ्या व्यक्तिंकडून वस्तू किंवा अंगावरील सोन्याचे दागिने ओढून नेणे तसेच शहरातील दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या चोरीचे प्रामाणही वाढले आहे. घरफोड्या, दिवसाढवळ्या पडणारे दरोडे यामुळे शहरातील वातावरण असुरक्षीत झाले आहे. भा.ज.पा. वकिल आघाडी व राऊ युवा प्रतिष्ठानच्या वतीने मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात स्वखर्चाने कॅमेरे बसविले आहेत, त्यामुळे या परिसरातील चोरिच्या घटनेचे प्रमाण कमी झाले आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेच शहरात असलेल्या पोलीस चौक्या बंद आहेत त्याही लवकरात लवकर कार्यरत कराव्यात अशी मागणी व्यापारी आघाडीचे अविनाश साखला यांनी केली आहे.





























































