जैन लॉबीपुढे झुकली भाजप, शेळी निर्यातीच्या निर्णयाला दिली स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

जैन लॉबीपुढे झुकत भाजप सरकारने आपला शेळी निर्यातीचा निर्णय स्थगित केल्याचं समोर येत आहे. हिंदुस्थान सरकारकडून शारजाला १५०० शेळ्या निर्यात होणार होत्या. पण, जैन समाजाने प्राण्यांवरील हिंसेचे कारण सांगून हा कार्यक्रम रद्द करायला सांगितला आणि भाजपने मान तुकवत हा कार्यक्रम रद्द केल्याचं वृत्त आहे.

या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. हिंदुस्थान सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून नागपूरहून शारजाला १५०० शेळ्या निर्यात केल्या जाणार होत्या. तशी कार्यक्रम पत्रिका तयार करून त्याची जाहिरातही केली होती. ३० जून रोजी नागपूरहून विमानातून या शेळ्या शारजात रवाना होणार होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त होणार होते. परंतु जैन समाजाने प्राण्यांवर हिंसा सांगून आपले वजन वापरून हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. त्यापुढे लोटांगण घालून भाजप सरकारने हा कार्यक्रम रद्दही केला.

भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देत म्हणाले की “या कार्यक्रमाला जैन समाजाचा मोठा विरोध होता, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आम्ही जैन समाजाशी चर्चा करून या व्यवसायात किती आर्थिक क्षमता आहे व विदर्भातील धनगर आणि शेतकरी समाजासाठी हे किती फायदेशीर आहे हे समजावून देऊ.’’

दिगंबर जैन महासमितीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रिचा जैन म्हणाल्या की “जैन समाज सर्व प्रकारच्या हिंसेच्या विरोधात आहे. संत्र्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरची या शेळीनिर्यातीमुळे बदनामी होण्याची शक्यता आहे. प्राण्यांवर हिंसा केल्याने पाप लागतं, नेपाळमध्ये अशी हिंसा केल्याने नैसर्गिक आपत्ती ओढवली होती.” असंही रिचा जैन यांचं म्हणणं आहे.

देशात दररोज होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीबद्दलच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की “कायद्यानुसार तुम्ही मांस निर्यात करू शकता, जिवंत प्राणी नाही. आम्ही प्राण्यांच्या कत्तलीविरोधातही आहोत.” मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे आज शेळी निर्यातीविरोधात याचिका दाखल करू असेही त्या यावेळी म्हणाल्या.

यू एस एंटरप्रायझेसचे मालक उल्हास मोहिते ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हणाले की “आम्ही सर्व प्रकारची व्यवस्था केली होती. राजस्थानवरून नागपुरमध्ये शेळ्या आणल्या होत्या. त्या आम्ही विशेष विमानाने दुबईला निर्यात करणार होतो. या कार्यक्रमावर खूप पैसे खर्च केले होते, आता झालेले नुकसान सरकार आम्हाला भरून देईल.”

आयोजकांना सरकार देणार नुकसान भरपाई
शेळी निर्यातीच्या विरोधावर आश्चर्य व्यक्त करत मोहिते म्हणाले की “शेळी निर्यातीचे असे उपक्रम आधीपासून राबवले जात असून राजस्थानमधून शेळ्या निर्यात केल्या जातात. नागपूरहून शेळी निर्यातीची सुरुवात करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असता”. एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली की ‘धनगर समाजाला पुढे नेण्यासाठी हा उपक्रम होता. हा कार्यक्रम रद्द केल्याने अनेक लोकांना वाईट वाटत आहे.” पुढेही हा कार्यक्रम होईल की नाही याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली.

भाजपचा दुटप्पीपणा काँग्रेसची टीका
गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी भाजपच्या शेळी निर्यातीवर आश्चर्य व्यक्त केले. यावर प्रतिक्रिया देताना दोशी म्हणाले की “रालोआचे सरकार असताना भाजपने शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी अशीच योजना राबवली होती, तेव्हा भाजपने रालोआच्या पिंक रिव्हॅल्युशनवर जोरदार टीका केली होती. मात्र, आता केंद्रात सरकार आल्यावर त्यांनी मांस निर्यातीचे धोरण स्वीकारले” असे सांगून त्यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले आहे.