
सामना प्रतिनिधी । कोलकाता
भाजप ही फक्त इतिहास, नावे, नोटा आणि घटना बदलणारी पार्टी आहे. हा पक्ष गेम चेंजर नाही, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. सध्या देश संकटात सापडलेला असून या संकटातून देशाला वाचवण्यासाठी आपला पक्ष महत्त्वाची भूमिका करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.जणू काही आपणच या देशाला जन्माला घातले अशा आविर्भावात भाजप आज आहे; परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी भाजप कोठेही नव्हता, असे ममता यांनी सांगितले.
निवडणुकीनंतर भाजप स्टॅच्यू होणार
सरकारी संस्थांना बदनाम करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. रिझर्व्ह बँक आणि सीबीआय यांची काम करण्याची एक पद्धत आहे. ही पद्धत बदलण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. व्होटबँकेच्या राजकारणासाठी भाजप पुतळे उभारू लागला आहे; परंतु 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एक स्टॅचू (पुतळा) बनेल, असा इशारा ममता यांनी दिला. भाजपला फक्त एनआरसीमध्ये रस आहे; परंतु एनआरसी आम्ही प. बंगालमध्ये लागू करू देणार नाही, असेही ममतांनी बजावले.
भाजपविरोधकांना तृणमूल एकत्र आणणार
भाजपविरोधात सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी तृणमूल काँग्रेस जानेवारीमध्ये एक रॅली घेणार आहे. ‘भाजप हटाओ… देश बचाओ’ हे या रॅलीचे घोषवाक्य राहणार असल्याचे ममता यांनी स्पष्ट केले.
























































