हे पाहा! प्रचारकच म्हणतात केंद्रात भाजपची सत्ता नाही, ऑडिओ क्लिप व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

नगर महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपने लढवलेली शक्कल त्यांच्याच अंगाशी आली आहे. फोनवरून प्रचार करून भाजपलाच मत द्या असं सांगणाऱ्यांना प्रतिप्रश्न केल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली आणि या गोंधळात त्यांनी केंद्रात भाजपची सत्ताच नसल्याचा दावा केला. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं भाजपची बौद्धिक दिवाळी उघड झाली आहे

नगर आणि धुळे येथे महापालिका निवडणुकीच्या प्रचारानं चांगलाच जोर धरला आहे. नगरमध्ये छिंदम आणि त्याला पाठीशी घालणारे खासदार गांधी यांच्यामुळे भाजपची प्रतीमा मलिन झाली आहे. तर धुळ्यात भाजप आमदार गोटे यांनीच पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला या दोन्ही महापालिकेत विजय कठीण वाटत आहे. त्यासाठी त्यांनी प्रचाराच्या वेगवेगळ्या शक्कल लढवल्या आहेत. भाजपकडून मतदारांना फोनवरून संपर्क साधून मतांची मागणी करण्यात येत आहे. फोन धुळ्यातील भाजप कार्यालयातून करण्यात येत आहेत. अशातच एका फोनवर मतदाराने भाजपला मत का देऊ? असा प्रश्न केला. अचानक आलेल्या या प्रश्नाला फोनवरील प्रचारक महिलेने आधी टाळण्याचा प्रयत्न केला. पण मतदाराने पुन्हा प्रश्न केल्यावर तिने भाजपची सत्ता आली तर प्रश्न सुटतील, असं उत्तर दिलं. त्यावर केंद्रात आणि राज्यात कुणाची सत्ता आहे, असा प्रतिप्रश्न मतदाराने केला. त्याला उत्तर देताना केंद्रात भाजपची सत्ता नसल्याचा दावा या महिलेने केला. त्यावर मतदार चिडला आणि अभ्यास करा मग फोन करा असा त्याने दिला.

ही ऑडिओ क्लिप नगर आणि धुळ्यात चांगलीच व्हायरल झाली असून भाजपचा प्रचार बुमरँग झाला आहे.