
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
गुजरातमध्ये भाजपने काँग्रेसचे आमदार कुमार बावलिया यांना फोडून मंत्रीपद दिल्यानंतर काँग्रेसने भाजपला सौराष्ट्रात खिंडार पाडून लगेच हिसाब चुकता केला आहे. तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले सौराष्ट्रातील ज्येष्ठ भाजप नेते कनुभाई कलासारिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या राज्यात हा जबरदस्त धक्का देण्याची कामगिरी काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी केली आहे. माजी आमदार कनुभाई कलासारिया यांच्या काँग्रेस प्रवेशाची माहिती सातव यांनीच ट्विटरवरून दिली आहे. कलासारिया यांच्या सौराष्ट्रातील प्रभावामुळे लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपचा पराभव होईल, असा विश्वास सातव यांनी व्यक्त केला आहे.
सातव यांनी सौराष्ट्रात भाजपला खिंडार पाडण्याची ही कामगिरी काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष अमित चावडा, विरोधी पक्षनेते परेश धनानी यांच्या माध्यमातून फत्ते केली.





























































