
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या झालेल्या ‘आघाडी’मुळे भाजपवाल्यांचे धाबे किती दणाणले आहे हे आता समोर येऊ लागले आहे. त्या ‘आघाडी’नंतर भाजपच्या मुगलसराय येथील आमदार साधना सिंह यांचे जणू डोकेच फिरले असून त्यांनी बसपा नेत्या मायावती यांना ‘तृतीयपंथीय’ म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने भाजपच्या त्या महिला आमदाराला नोटीसही बजावली असून त्यांचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
मायावती यांना लखनऊच्या गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या स्वतःच्या वस्त्रहरणाचा साफ विसर पडला आहे. म्हणूनच त्यांनी समाजवादी पार्टीशी आघाडी केली आहे. बसपा अध्यक्षा या ना महिला आहेत, ना पुरुष आहेत. त्यांची गत तर तृतीयपंथीयांच्या पलीकडची आहे, असे भयंकर वक्तव्य भाजप आमदार साधना सिंह यांनी शनिवारी केले. त्या चंदौली येथील जाहीर सभेत बोलत होत्या.
ज्या महिलेचे वस्त्रहरण होते, जिचा ब्लाऊज फाडला जातो, पेटीकोट फाटतो, साडी फाटते, ती महिला सत्तेसाठी पुढे येत असेल तर ती कलंकित आहे. तिला महिला म्हणायलाही संकोच वाटतो, असे साधना सिंह म्हणाल्या. द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा तिने दुःशासनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञाच घेतली होती. पण इथे तर मायावती यांनी वस्त्रहरण, अपमान विसरून सत्तेसाठी सन्मानच विकला आहे, त्याबद्दल आम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतो, असे त्या भाजपच्या महिला आमदाराने सांगितले.
आमचा ‘रिपाइं’ भलेही भाजपसोबत असेल; पण मायावती यांच्याबद्दलची अशी निंद्य वक्तव्ये आम्ही सहन करू शकत नाही. त्या सक्षम महिला नेत्या आणि उत्तम प्रशासक आहेत. माझ्या पक्षातील कोणी असे बोलला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
– रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
भाजप आमदार साधना सिंह यांचे वक्तव्य त्यांची पातळी दाखवते. आमच्या सपा-बसपा आघाडीमुळे भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आग्रा किंवा बरेलीच्या मनोरुग्णालयात दाखल केले पाहिजे.
– सतीशचंद्र मिश्रा, नेते, बसपा
भाजप आमदार साधना सिंह यांचे वक्तव्य म्हणजे नैतिक दिवाळखोरीच आहे.
– अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पार्टी





























































