अखेर पंकजा मुंडे बोलल्या, फेसबुक पोस्टनंतर पहिली प्रतिक्रिया

7848

फेसबुक पोस्टनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या प्रथमच कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत. आपल्याला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे आपण नुकत्याच केलेल्या फेसबुक पोस्टबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही. आपण दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेतो. त्या 12 डिसेंबरच्या कार्यक्रमातच आपण आपले मनोगत व्यक्त करणार आहोत. त्याबाबत आपण फेसबुक पेजवर पोस्ट केली होती, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

सर्व वर्तमानपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी योग्य प्रकारे ती बातमी दिली. मात्र, काही जणांनी आपण नाराज असून पक्ष सोडणार असल्याचे वृत्त दिले. आपल्या फेसबुक पोस्टचा अशाप्रकारे विपर्यास करण्यात आल्याने आपण व्यथीत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. या चुकीच्या वृत्तानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाल्याने त्रास होत आहे. आपण कोणत्या पदासाठी हे करत आहोत असाही आरोप होत आहे. मात्र, मला कोणते पद मिळू नये, यासाठी हे सर्व करण्यात येत आहे काय अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

मी मुख्यमंत्रीपदाचा दावा केल्याच्या बातम्या 2014 मध्ये करण्यात आल्या होत्या, त्यानंतर मी जनेतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा बातम्या पेरण्यात आल्या. त्यानंतर आता फेसबुक पोस्टचा विपर्यास करणारी बातमी देण्यात आली. त्यामुळे आपण व्यथीत झालो आहोत. निवडणुकीत पराभव झाला असला तरी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण सभा घेत होतो. आपण मनापासून जनतेची सेवा केली आहे. कोणत्याही पदासाठी आपण लाचारी स्विकारली नाही किंवा कोणत्याही पदासाठी दबाव टाकलेला नाही. ते आपल्या रक्तात नाही. आपण पक्ष सोडणार असल्याच्या अफवा असून बंडखोरी आपल्या रक्तात नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आता आपल्याला आत्मचिंतनासाठी आणि आपल्या लोकांशी काय बोलायचे याची तयारी करण्यासाठी वेळ हवा आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

परळी या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून पराभव झाल्याने आणि पक्षानेच आपला गेम केला असा समज झाल्याने काहीशा नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टनंतर ट्विटर हॅण्डलवरून भाजपची ओळख हटवली. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली होती. मंगळवारी बबनराव लोणीकर, विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.

पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

12 डिसेंबरला काय बोलणार…
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आपला पुढील प्रवास ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबरला गोपिनाथगडावरून पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या