मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटात कलगीतुरा; महासभा, सुधार समिती प्रस्तावांवरून वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात सुधार समिती आणि महासभेतील प्रस्तावांवरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सुधार समितीत अध्यक्षा संध्या दोशी भाजपचे बहुमत असताना प्रस्तावांवर चर्चा, मतदान न घेता प्रस्ताव मंजूर करतात. त्यांचे पती विपुल दोशी सुधार समितीत हस्तक्षेप करतात असा आरोप भाजप नगरसेवकांकडून केला जात आहे, तर महासभेत सभागृह नेता गणेश खणकर आपल्याला विश्वासात न घेता प्रस्ताव तहकूब करीत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात सत्तास्थापनेपासूनच कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. यातच आज शिंदे गटाच्या संध्या दोशी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवरच आरोप केल्याने दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे राजकारण समोर आले आहे. सर्व प्रस्ताव चर्चेनंतरच बहुमताने मंजूर होतात. भाजपचेच नगरसेवक विपुल दोशी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. विपुल दोशी सुधार समितीत कोणताही हस्तक्षेप करीत नाहीत. ते सभेलाही उपस्थित नसतात, असे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे, महासभेत 21 क्रमांकाचा टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट हा प्रस्ताव अशाच प्रकारे सभागृह नेत्यांनी आपल्याला विश्वासात न घेता तहकूब केला असा आरोप करीत संध्या दोशी यांनी  शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले आणि सभागृह नेते गणेश खणकर यांना पत्र दिले आहे. खणकर यांनीही याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही संध्या दोशी यांनी केली आहे.

चर्चा, मतदान न घेताच प्रस्ताव मंजूर

सुधार समितीत भाजपचे 9 तर शिंदे गटाचे केवळ 3 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपचे मतदान निर्णायक ठरू शकते. मात्र चर्चा, मतदान न घेता प्रस्ताव थेट मंजूर करून भाजप नगरसेवकांच्या मताला महत्त्व दिले जात नाही, असा भाजपचा आरोप आहे. वडाळय़ातील दोन भूखंड एकत्र करून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या कलम 33 (7) अंतर्गत पुनर्विकासाचा प्रस्ताव अशाच प्रकारे मंजूर केल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे.

आपल्याला विश्वासात न घेता परस्पर प्रस्ताव तहकूब केले जात असतील तर यात महापौर, सभागृह नेते आणि गटनेत्यांनी लक्ष घालावे. असे प्रकार पुन्हा घडल्यास माझ्या पदाचा, पक्षाचा अवमान समजून निर्णय घ्यावा लागेल. – संध्या दोशी, शिंदे गट

एखाद्या समितीचे अध्यक्ष सभागृहात उपस्थित असताना अशा प्रकारे सभागृह नेत्यांनी प्रस्ताव वाचून तहकूब करण्याची पद्धतच नाही. या प्रस्तावाबाबत अनावधानाने असे घडले असण्याची शक्यता आहे. आमच्या कुठलाही वाद नाही. गैरसमज असल्यास चर्चा करून मिटवू. – गणेश खणकर, पालिका सभागृह नेते

महापौरांपासून भाजप आणि शिंदे गटात नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. यांना मुंबईकरांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. दुसऱयांना भ्रष्टाचाराचे धडे शिकवतात, मात्र सत्तेत आल्यापासून भाजप-शिंदे गटाचे केवळ पैसे कमवण्याचे धंदे सुरू आहेत. – किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेता

भाजपचा आक्षेप काय?

सुधार समितीच्या अध्यक्षा शिंदे गटाच्या संध्या दोशी यांच्या कार्यपद्धतीवर भाजप नगसेवकांनी आक्षेप नोंदवला आहे. याबाबत भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. सुधार समितीत अनेक प्रस्ताव चर्चा किंवा मतदानाची संधी न देता मंजूर केले जातात, असा त्यांचा आरोप आहे.