
सामना प्रतिनिधी, लातूर
मित्रपक्षांशी युती होईल की नाही याची चिंता करू नका, तमा बाळगू नका असे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगत भाजपने आज येथे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वबळाच्या ‘बेटकुळय़ा’ फुगवल्या.
लातूर येथे लातूर जिल्ह्यासहीत धाराशीव, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघांमधील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांचा एक संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उसने अवसान आणले तर अमित शहांनी दर्पोक्ती केली. देशात पुन्हा मोदी सरकार आणून दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
2019च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपचा विजय इतका मोठा आणि नेत्रदीपक असावा की तो पाहून विरोधकांना ‘हार्टऍटॅक’च आला पाहिजे असे अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना बजावले. केंद्रात मोदी सरकारला आणखी मजबूत करण्यासाठी मित्रपक्षांना सामाकून घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. युती होईल की नाही यात कार्यकर्त्यांनी पडू नये. जे आपल्यासोबत येतील त्यांच्यासोबत निकडणूक लढू पण जे येणार नाहीत त्यांनाही किरोधकांप्रमाणे उखडून फेकू असे त्यांनी सांगितले.
2 कोटी मते मिळवा – फडणवीस
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्व 48 लोकसभा मतदारसंघांत उमेदवार देईल. मित्रपक्षांच्या जागेवरही भाजपचेच उमेदवार असतील. त्यामुळे 40 पैकी 40 जागांवर भाजप विजयी झाला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरात मांडली.
राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार असतील. मित्रपक्षांच्या जागाही यंदा भाजपच लढेल. 48 पैकी किमान 40 जागांवर आपण विजयी झाले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे. मित्रपक्षांसोबत युती करायची की नाही हा अध्यक्षांचा विषय आहे. त्यात अडकून पडायची गरज नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जाहीरनामा, प्रचार-प्रसार आणि सामाजिक-स्वयंसेवी संघटनांशी संपर्क यासाठी तीन स्वतंत्र समित्यांची स्थापना आज केली. त्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील जाहीरनामा समितीमध्ये अरुण जेटली, निर्मला सीतारामन, थावरचंद गेहलोत, रविशंकर प्रसाद, शिवराजसिंग चौहान यांच्यासोबतच खासदार नारायण राणे यांनाही स्थान देण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील प्रचार-प्रसार समितीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राजवर्धन राठेड, डॉ. अनिल जैन, डॉ. महेश शर्मा आदींचा समावेश आहे, तर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील सामाजिक-स्वयंसेवी संघटना संपर्क समितीमध्ये कैलाश विजयवर्गीय, कलराज मिश्र, सदानंद गौडा, बंडारू दत्तात्रेय, एस. एस. अहलुवालिया आदींचा समावेश आहे.
भाजप सर्व 48 लोकसभा मतदारसंघांत उमेदवार देईल. मित्रपक्षांच्या जागेवरही भाजपचेच उमेदवार असतील. 48 पैकी 40 जागा आम्ही जिंकू
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
युती होईल की नाही, यात कार्यकर्त्यानी पडू नये. जे आपल्या सोबत येतील, त्यांना घेऊन निवडणूक लढू, पण जे येणार नाहीत त्यांना विरोधकांप्रमाणे उखडून फेकू.
– भाजपाध्यक्ष अमित शहा





























































