बेळगाव महानगरपालिका निवडणूक- अचानक निवडणुका जाहीर करत भाजपने टाकला कुटील डाव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक आठ वर्षांनंतर झाली. यापूर्वी 2013 साठी निवडणूक झाली होती. मात्र, 2018 ला मुदत संपल्यानंतर चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केल्यामुळे याबाबतचा वाद न्यायालयात होता. वॉर्ड रचनेच्या कारस्थानाचा वाद सुरू असतानाच कर्नाटकातील सत्ताधारी भाजपने घाईघाईने निवडणुका जाहीर करत कुटील डाव टाकला. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढा चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव पालिकेत प्रथमच मराठी एकजुटीचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मराठी भाषिक महापौरांना मारहाण, काळे फासणे तसेच महापालिकेवरील भगवा ध्वज काढून कानडी प्रशासनाने आजपर्यंत मराठी द्वेष दाखवला आहे. कानडी दडपशाही आणि अत्याचार सहन करत मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव महापालिकेवर आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तीन वर्षांपूर्वी क्षुल्लक कारण पुढे करत कर्नाटक सरकारने पद्धतशीरपणे महानगरपालिका बरखास्त केली होती. यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत प्रथमच ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. भाजपसह काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले होते. याचा फटका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना बसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या या अनपेक्षित निकालामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

बेळगाव महापालिकेच्या 58 जागांसाठी तब्बल 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणुकीत मतदानासाठी प्रथमच ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात राज्यातील सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व इतर राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार उभे करून स्टार प्रचारकांद्वारे जोरदार यंत्रणा राबविली होती. शुक्रवारी (दि. 3) केवळ 50.41 टक्के मतदान झाले. त्यात प्रभाग पुनर्रचना, मतदार यादीतील घोळाचा प्रचंड फटका मराठी भाषिक उमेदवारांना बसल्याचे आजच्या निकालातून समोर आले.

बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कित्येकवेळा मराठी माणूसच येथे महापौर झाला. यावेळी बेळगावमध्ये प्रभाग रचना बदलून मराठी माणसाला जाणूनबुजून फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केला होता. निकालानंतर भाजपची ही खेळी यशस्वी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.

मराठी भाषिकांकडून संताप

बेळगाव महानगरपालिकेत एक हाती सत्ता मिळाल्याबद्दल भाजप नेते आशीष शेलार यांनी हा हिंदुत्वाचा विजय असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. बेळगावात मराठी एकजुटीचा पराभव झालेला असताना महाराष्ट्रात भाजपकडून आनंद साजरा केला जात आहे. याबद्दल सीमा भागातील तसेच राज्यातील मराठी भाषिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मराठी माणूस हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटताय, लाज वाटत नाही – संजय राऊत

बेळगावात मराठी माणसाच्या झालेल्या पराभवाबद्दल आज महाराष्ट्रात ज्यांना उकळ्या फुटत आहेत, जे आज पेढे वाटताहेत त्यांना एवढेच सांगतो की, महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासात इतकी नादानी, इतका नालायकपणा आणि मराठी माणसाच्या बाबतीत इतकी गद्दारी कुणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना याचे दुःख आहे की तिथे मराठी माणूस हरवला गेला. मग तुम्ही पेढे कसले वाटताय, लाज वाटत नाही  का, असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

मराठी माणूस बेळगावमध्ये सत्ता स्थापन करेल अशी आम्हाला खात्री होती. याआधी बेळगावमध्ये मराठी एकजुटीचाच विजय झाला आहे; पण आज 2 किंवा 3 जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्दैवी जरी असले तरी यामागे किती कारस्थान झाले असेल याची कल्पना करवत नाही. कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगाववर महाराष्ट्राचा हक्क राहू नये, यासाठी काय गडबड केली आहे त्यासंदर्भात माहिती हळूहळू समोर येईल, असे खासदार संजय राऊत म्हणाले.