
सामना प्रतिनिधी । बीड
भाजपच्या खासदार आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यासाठी आलेले काँग्रेसचे पदाधिकारी दादासाहेब मुंडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच भाजप कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यासाठी एक मतदार म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी दादासाहेब मुंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आक्षेपही नोंदविला, मात्र ते मतदार असल्यामुळे त्यांचा आक्षेप त्याचवेळी फेटाळण्यात आला. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनातून बाहेर जात असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी दादासाहेब मुंडे यांना राजकीय पूर्ववैमनस्यातून जबर मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे राजकीय कामकाज दादासाहेब मुंडे पाहत होते. स्व.मुंडे बीडमध्ये दाखल होताच दादासाहेब मुंडे हे त्यांच्या सोबत असायचे. पुढे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत वाद झाल्याने त्यांनी भाजपवर तोफ डागायला सुरूवात केली होती. त्यातूनच भाजप कार्यकर्त्यांसोबत नेहमी खटके उडत असत. अलिकडेच काही महिन्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बुधवारी दादासाहेब मुंडे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात आक्षेप घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना समजल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मारहाण करणारे कार्यकर्ते कोण होते, जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच झालेला हा राडा पोलीस का रोखू शकले नाहीत या बद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल.





























































