
सामना प्रतिनिधी । जालना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे काम करणाऱ्या जालना येथील एका कार्यकर्त्यावर मंगळवारी भाजपाचे आमदार नारायण कुचे यांच्या भाच्याने तलवारीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना जालना शहरातील भोकरदन नाका येथे घडली आहे.
या हल्ल्यात भीमराव डिघे नावाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी कार्यकर्त्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या भाच्याने हा हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मारहाण करणाऱ्या कुचे यांच्या भाच्यासह आमदार कुचे यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
भीमराव डिघे हा बदनापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचं काम करतो. भाजप आमदार नारायण कुचे यांना त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट सहन होत नसल्याने ८ नोव्हेंबर रोजी डिघे याला ‘एक दिवस तुला हे महागात पडेल अशी धमकी दिली होती.’ दरम्यान काल रात्री ऑफिसचे काम आटोपून घरी जात असताना आमदार कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे आणि आणखी दोघांनी त्याला रस्त्यात अडवून तलवारीने हाता पायावर वार करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई या प्रकरणी केलेली नाही.




























































