मध्य रेल्वेची ‘निळय़ा दिव्या’ची आयडिया हिट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मध्य रेल्वेवर चालती ट्रेन पकडण्याच्या नादात होणारे अपघात टाळण्यासाठी लोकलच्या दरवाजावर बसविलेल्या ‘निळय़ा’ दिव्याची आयडिया चर्चेचा विषय बनली आहे. या ‘निळय़ा दिव्या’चा व्हिडीओ थेट रेल्वेमंत्र्यांनीच सोशल मीडियावर शेअर केल्याने पश्चिम रेल्वेच्या इंजिनिअर्सनी हे तंत्रज्ञान पाहण्यासाठी सोमवारी मध्य रेल्वेच्या तंत्रज्ञांशी भेट घेऊन चर्चा केली.

लोकल ट्रेन पकडण्याच्या घाईत कधी कधी  ट्रेन पटकन सुरू होत असल्याचा अंदाज विशेषतः लहान मुले, महिला, तसेच वृद्धांना येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना गाडी पकडताना अपघात होण्याची शक्यता असते. ही समस्या दूर करण्यासाठी मेट्रोप्रमाणे एखादी यंत्रणा असावी असा विचार मध्य रेल्वेचे इंजिनीयर जोसेफ मलाची यांनी केला. त्यातून व्हिज्युअल संदेश देणारा ‘निळय़ा दिव्याचा’ इशारा देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एका लोकलला ही निळय़ा दिव्याची यंत्रणा बसविण्यात आली. मध्य रेल्वेच्या या कल्पनेचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कौतुक करीत त्याचा व्हिडीओ रविवारी समाज माध्यमांवर शेअर केला. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या इंजिनीअर्सनी शनिवारी हे तंत्रज्ञान पाहण्यासाठी सोमवारी कुर्ला कारशेडला भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी रेल्वेच्या इंजिनीअर्सनी साध्या लोकलच्या डब्याला स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयोग तितकासा यशस्वी झाला नाही. दरवाजे बंद झाल्यास लोकलच्या आतील प्रवाशांना मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे हा प्रयोग फसला.

दिवा पाहण्याची तरी फुरसत हवी!

मुंबईच्या गर्दीत दिवे पाहण्याचीही फुरसत प्रवाशांना नसते. प्रवाशांकडे दिवे बघण्याएवढा वेळसुद्धा असायला हवा. त्यामुळे या दिव्याबरोबरच गाडीच्या बाहेर अलार्मदेखील वाजायला हवा, अशी मागणी डोंबिवलीकर प्रवासी बळीराम राणे यांनी केली आहे.