छटपूजेसाठी आता पालिका स्वखर्चाने कृत्रिम तलाव बनवणार! विभाग अधिकाऱयांना प्रशासनाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छटपूजेसाठी आता पालिका स्वखर्चाने कृत्रिम तलाव तयार करणार आहे. यासाठी विभाग अधिकाऱयांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. यासाठी पालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. समुद्रकिनारी छटपूजा साजरी करण्यास बंदीच राहणार आहे. पालिकेने याआधी काढलेल्या नियमावलीनुसार कृत्रिम तलाव आयोजक संस्थेने स्वतः तयार करावेत आणि ते स्वखर्चाने बुजवावेत असेही निर्देश दिले होते. यावर पालिकेवर जोरदार टीका होत होती.

उत्तर भारतीय समाजाकडून दरवर्षी मोठय़ा उत्साहात छटपूजा सण साजरा केला जातो. समुद्रकिनारी, तलाव, नदीकिनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या दरम्यानच्या कालावधीत मोठय़ा संख्येने महिला, भाविक यासाठी जमा होतात. या वर्षी 10 व 11 नोव्हेंबर रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. मात्र मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात असला तरी अजूनही दररोज शेकडो रुग्ण आढळून येत असल्यामुळे पालिकेने यावर्षी समुद्रकिनारी साजऱया होणाऱया छटपूजेला परवानगी नाकारून साध्या पद्धतीने छटपूजा साजरी करण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे, कृत्रिम तलाव आयोजक संस्थेने स्वतः तयार करून आणि कोरोना नियम पाळून छटपूजा साजरी करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. दरम्यान, पालिकेने छटपूजेसाठी स्वखर्चाने कृत्रिम तलाव तयार करावेत यासाठी कॉंग्रेसने राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पालिका मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

अशी आहे नियमावली

  • खुल्या जागेत होणाऱया कार्यक्रमासाठी 50 टक्के आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती ही मर्यादा राहणार आहे. तर बंदिस्त जागेत होणाऱया कार्यक्रमासाठी एकूण क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 100 व्यक्ती ही मर्यादा असेल.
  • फक्त पूजेसाठी परवानगी असेल. सामूहिक सोहळय़ात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे आवश्यक. मास्क बंधनकारक.
  •  छटपूजेच्या ठिकाणी सॅनिटायझेशन आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी लागेल.
  • पूजेच्या ठिकाणी कोविड वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची कोरोना चाचणी करावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावेत.