सीएसएमटीजवळील कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी भुयारी मार्ग बांधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पूल कोसळल्यानंतर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन आता प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग उभारण्याच्या कामी लागला आहे. कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी पुन्हा नवा पूल उभारण्याऐवजी भुयारी मार्ग (सब-वे) बांधण्यात यावा अशी रेल्वेची सूचना आहे. महानगरपालिका प्रशासनाने मात्र त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.

सीएसएमटी स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुन्हा पादचारी पूल उभारावे की सब-वे बांधावा याबाबतचा निर्णय पालिकेच्या प्रक्रियेनुसार घेण्यात येईल असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. पुलापेक्षा सब-वेमध्ये प्रवाशांची वर्दळ चांगल्या रीतीने होते असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.