पालिकेतील सुरक्षारक्षकांच्या रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय , युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांची 1800 रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये जलाशये, रुग्णालय, उद्यान, स्मशानभूमी अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची 1800 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांवर कामाचा ताण असतो. काही वेळा त्यांना डबल डय़ुटी करावी लागते. सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे पालिकेच्या उद्यान, मैदानात चोऱ्या आणि गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांची ही पदे भरावीत यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार वरळी युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. बैठकीला उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपआयुक्त प्रभात रहांगदळे, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे आदी उपस्थित होते.