मुंबईतील खड्डे शोधण्यासाठी गुगल, मॅपिंग, सॅटेलाइट इमेजिंगची मदत घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

येणाऱ्या पावसाळ्यात खड्डयांमुळे मुंबईकरांचे हाल होऊ नयेत यासाठी पालिका प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. खड्डे शोधण्यासाठी गुगल मॅपिंग, सॅटेलाइट इमेजिंग आदी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असून मान्सूनपूर्व तयारी म्हणून पालिकेने मुंबईतील 1113 मार्ग व 121 जंक्शनवर दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी 664 मार्ग आणि 106 जंक्शनवरील कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती पालिकेने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी खड्डयांसंदर्भात मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत पालिकेच्या वतीने आज प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. खड्डे असलेल्या भागात इलेक्ट्रॉनिक फलक, साईन बोर्ड, फिरते सूचना फलक लावण्यात येणार आहेत. तसेच अपघातप्रवण क्षेत्रात मोबाईल रुग्णवाहिका, त्याकरिता टोल फ्री क्रमांक आदी सेवा पुरविण्यात येणार आहेत. खड्डयाची तक्रार नोंदवण्यासाठी पालिकेची वेबसाईट, मोबाईल ऍप व व्हॉटस् ऍप नंबर देणार आहेत. खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली.