राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा नेहमीपेक्षा परीक्षा 10 ते 15 दिवस लवकर होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे.
बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात घेतली जाते. मात्र विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, यासाठी यंदा परीक्षा लवकर घेण्यात येणार आहे, असे राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनची परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनची परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी या काळात होईल.
23 ऑगस्टपर्यंत हरकती पाठवा
दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या 23 ऑगस्टपर्यंत पाठवण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
सविस्तर वेळापत्रक नंतर
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर वेळापत्रक हे केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी दिली.