
सामना प्रतिनिधी । पिंपरी
सत्ताधारी भाजपच्या राजवटीत सातत्याने कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पुण्यात असतानाच भाजपच्या आळंदी नगरपरिषदेतील नगरसेवकाचा दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून झाला, तर ८ दिवसांपूर्वी शहरातील भाजप आमदाराच्या ‘बॉडीगार्ड’ला मारहाण करत त्रिकुटाने त्याच्या गळ्यातील सव्वालाखाची सोनसाखळी हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना नुकतीच पिंपळे-गुरव येथे घडली. आमदारांचे संरक्षण करणारा पोलीसच सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शैलेश काळभोर (वय ३६, रा. पिंपळे- गुरव) असे मारहाण झालेल्या बॉडीगार्डचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली आहे. काळभोर हे पोलीस शिपाई असून, पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. सध्या त्यांची डय़ुटी सत्ताधारी भाजप आमदाराचे ‘बॉडीगार्ड’ म्हणून आहे. काळभोर हे २१ जून रोजी त्यांच्या लोणी काळभोर गावावरुन मोटारीतून येत होते. काशिद पार्कजवळ स्कॉर्पिओमधील त्रिकुटाने त्यांना अडवित मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसका मारून तोडली आणि पळ काढला.
































































