चोरांना जेरबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

नगर शहर आणि एम.आय.डी.सीच्या मध्यावर असलेल्या बोल्हेगाव परिसरात गेल्या आठ दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत झाले असून काही नागरिकांवर हल्ले ही झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करून त्यांना जरेबंद करा, अन्यथा आठ दिवसात रास्तारोको आंदोलन करणार अशा इशारा नागरिकांनी दिले आहे. याबाबतचे निवेदन नागरिकांनी सह उपअधीक्षक संदीप मिटके यांना दिले आहे.

‘बोल्हेगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांनी राघवेंद्र स्वामी मंदिरात, किराणा दुकानात, डॉ.कांबळे यांच्या घरी घरफोडी, आदेश लॉनवर कर्मचाऱ्यांना मारहाण असे प्रकार गेल्या आठ दिवसापासून घडले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात व परिसरात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. चोरट्याकडून भविष्यात जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राघवेंद्र स्वामी मंदिरात देवाचा चांदीचा मुकुट चोरीस गेल्याने,धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात यावी. तरी येत्या आठ दिवसात चोऱ्या बंद न झाल्यास आम्ही सर्व नागरिक रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, मदन आढाव, बाबूराव खालकर, अक्षय नागापुरे, सुरज मिसाळ, संतोष इंगळे, ज्ञानेश्वर लबडे, संदीप कोरडे, बद्रीनाथ देशमुख, प्रसन्ना ब्राम्हणकर, विलास शेलार, प्रकाश सप्रे, पप्पू रेपाळे, अनिल शिंदे, दिनेश आव्हाड, भाऊ देशमुख, संपत सोनवणे उपस्थित होते.